मुंबईत ‘मिशन बिगीन अगेन फेज ४’ ची नियमावली जाहीर

coronavirus scientists say social distancing need to continue till 2022
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘मिशन बिगीन अगेन फेज ४’ अंतर्गत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतेच सुधारीत निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार मास्क लावणे बंधनकारक करतानाच सार्वजनिक ठिकाणी किमान ६ फुटांचे अंतर ठेवले जावे. तसेच दुकानांमध्ये एकाच वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जावू नये, असे अशाप्रकारचे फर्मान जारी केले आहे

‘कोविड कोरोना – १९’ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुधारीत निर्देशांची आणि मार्गदर्शक तत्त्वांची सुयोग्य अंमलबजावणी नियोजनबद्धरित्या करण्यात येत आहे. यानुसार ‘मिशन बिगीन अगेन फेज ४’ अंतर्गत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतेच सुधारीत निर्देश दिले आहेत. आयुक्तांनी या निर्देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबत दंडात्मक कारवाई तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू – पान खाणे इत्यादी बाबींना मनाई करण्यात आली आहे.

विवाह – अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही

सार्वजनिक एकत्रिकरणावर पूर्णपणे प्रतिबंध घालतानाच विवाहासाठी किंवा अंत्यविधीसाठी पन्नासपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी नसेल. गर्दी टाळण्याच्यादृष्टीने आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लग्न कार्यांसाठी ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाही, याची काळजी घेऊन आणि शारीरिक दूरीकरण अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह यामध्ये लग्न समारंभ पार पाडण्यास संबंधित अटींसापेक्ष परवानगी दिली जाणार आहे.

शक्यतो घरुनच काम करा!

महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांच्या तथा कामाच्या ठिकाणांसाठी मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये महापालिका प्रशासनाने शक्यतो घरुन काम करण्याची अर्थात वर्क फ्रॉर्म होमची संकल्पना अवलंबण्याची सुचना केली आहे. या अंतर्गत कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये अनुरुप बदल करण्याच्याही सूचना केल्या आहेत. तसेच कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग करुन तापमान मोजण्याची व्यवस्था करणे, साबणाने हात धुण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करणे. तसेच प्रवेशद्वारावर आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था आदींचे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे.

कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये शारीरिक दूरीकरण अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. दोन शिफ्ट दरम्यान पुरेसा ‘गॅप’ असेल, तसेच जेवणासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळा या वेगवेगळ्या असतील इत्यादींची काळजी घेण्याचेही या नियमांमध्ये नमुद करण्यात आले आहे. याशिवाय पूर्ण कार्यालयाचे, कार्यालयातील सुविधांचे तसेच ज्या ज्या ठिकाणी मानवी संपर्क होऊ शकतो, अशा ठिकाणांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्याचे या निर्देशात म्हटले आहे.