घरCORONA UPDATEपूर्व-पश्चिम उपनगरामधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी “मिशन झिरो”

पूर्व-पश्चिम उपनगरामधील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी “मिशन झिरो”

Subscribe

“मिशन झिरो” अर्थात शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी या उपक्रमाचा आरंभ अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातून आज करण्यात आला आहे.

कोविड- १९ विषाणू विरुद्धच्या युद्धामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांना यश येत असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी आता ३६ दिवसांवर गेला आहे. असे असले तरी काही भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन त्या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम (Rapid Action Plan) राबविण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे. “मिशन झिरो” अर्थात शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी या उपक्रमाचा आरंभ अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातून आज करण्यात आला आहे.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमात ५० फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेणार आहेत. २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये चालणाऱ्या या शीघ्र कृती कार्यक्रमाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावरील हा उपक्रम मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या शुभारंभप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, एमसीएचआय – क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष नयन शाह, माजी अध्यक्ष धर्मेश जैन, उपाध्यक्ष नैनेष शाह, तसेच देश अपनाये, बिल आणि मेलिंडा गेटस् फाउंडेशन इत्यादी संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी टाळेबंदीचा कालावधी टप्प्या टप्प्याने शिथील करुन संपुष्टात आणतानाच पुनश्च हरिओम (मिशन बिगीन अगेन) ची घोषणा केली आहे. ही शिथीलता आणताना त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विविध संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे. त्या अनुषंगाने मुंबई महानगरामध्ये देखील विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेषत: महानगरपालिकेने विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) हे ध्येय निश्चित करुन अथक प्रयत्नांनी मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणला आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता ३६ दिवस झाला असून संसर्गावर प्रभावी नियंत्रण आल्याचे त्यातून सिद्ध झाले आहे. महानगरपालिकेच्या प्रयत्नांमध्ये लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक सेवाभावी संस्थांचा, जनतेचा मोलाचा सहभाग असल्याने हे शक्य झाले.

उपनगरात कोरोनाचा वाढत प्रभाव

रुग्ण दुप्पटीचा सध्याचा ३६ दिवसांचा सरासरी कालावधी आता ५० दिवसांपर्यंत नेऊन पुढे आणखी वाढविण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष्य आहे. मात्र मालाड (पी/उत्तर), बोरिवली (आर/मध्य विभाग), दहिसर (आर/उत्तर विभाग), कांदिवली (आर/दक्षिण विभाग), भांडूप (एस विभाग), मुलूंड (टी विभाग) आदी परिसरांमध्ये रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा मुंबई महानगराच्या सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी असून तेथे संसर्ग अद्याप वाढत असल्याचे लक्षात आले आहे. स्थानिक विभाग कार्यालयांच्या माध्यमातून सर्वतोपरी उपाययोजना करुनही हा संसर्ग वाढल्याने तेथे विशेष उपक्रम राबविण्याची निकड निर्माण झाली आहे. कारण या उपनगरांमध्ये मोठ्या इमारतींमध्येदेखील संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या लढाईसाठी शीघ्र कृती उपक्रम

एका बाजूला दाट वस्तींमधील कोरोनाची साखळी तोडण्यात यश येत असताना या विशिष्ट परिसरांमधील कोरोनाची साखळी देखील तोडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आता सरसावले असून सध्याची मोहीम आणखी तीव्र करण्यासाठी हा शीघ्र कृती उपक्रम आहे. विशेषत: पावसाळ्याची सुरुवात झाली असताना कोरोना संसर्गाच्या रुग्णांसह इतरही आजारांच्या रुग्णांचा वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही मोहीम जास्त महत्त्वाची आहे.

डॉक्टर्स व औषधांसह ५० फिरत्या दवाखान्यांची वाहने 

शीघ्र कृती कार्यक्रम “मिशन झिरो” अंतर्गत शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी डॉक्टर्स व औषधांसह ५० फिरत्या दवाखान्यांची वाहने (मोबाईल डिस्पेंसरी व्हॅन्स) मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरिवली, दहिसर आणि कांदिवली या सर्व परिसरांमध्ये जाऊन रुग्णांची प्राथमिक तपासणी करतील. त्यांना औषधेही दिली जातील. २ ते ३ आठवडे युद्ध पातळीवर (Mission Mode) हे कामकाज करून या भागातील रुग्णांची तपासणी सातत्याने केली जाईल. यातूनच कोरोना संशयित रुग्णांना त्वरित वेगळे करून त्याच परिसरात ताबडतोब त्यांची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाणार आहे. बाधितांचा वेळीच शोध घेऊन (Early Detection) उपचार करण्यात येतील. हे सर्व करत असताना कोरोनाविषयीची योग्य माहिती पुरवून रुग्णांसह जनतेची काळजी घेणे, नागरिकांच्या मनामधील कोरोना संदर्भातील अवास्तव भीती कमी करणे, नागरिकांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविणे इत्यादी बाबतीत जनजागृती देखील करण्यात येणार आहे.

संस्थांचा पुढाकार

मुंबई महानगरपालिका प्रशासनासमवेत स्थानिक डॉक्टर्स तसेच भारतीय जैन संघटना, देश अपनाये, क्रेडाई-एमसीएचआय यांचेही त्यात योगदान असेल. त्यासाठी या संघटना कोणताही मोबदला घेणार नसून सार्वजनिक – खासगी सहभाग तत्त्वावर फिरते दवाखाने वाहने (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन), डॉक्टर्स व औषधे यासाठी त्यांच्याकडून योगदान दिले जाणार आहे. तर चाचणी (स्वॅब टेस्टिंग) व अलगीकरण (quarantine) व्यवस्था इत्यादी बाबी महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्या जातील. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये सहभागी होतील. यामध्ये अधिकाधिक नागरिक व संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -