आमदाराच्या हॉस्पिटलची केडीएमसीकडून दहा लाखांची वसुली

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी स्वतःचे हॉस्पिटल कोरोनाविरोधातील लढाईसाठी मोफत देत असल्याचे जाहीर केले होते. पण कल्याण डोंबिवली महापालिकेकडून त्यांनी दहा लाख रूपये भाडे कराराअंतर्गत घेतले असल्याचे आता उघड झाले आहे.

mla charges municipality rs 10 lakh rent for hospital
मनसे आमदार राजू पाटील

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी स्वतःचे हॉस्पिटल कोरोनाविरोधातील लढाईसाठी मोफत देत असल्याचे जाहीर केले होते. पण कल्याण डोंबिवली महापालिकेकडून त्यांनी दहा लाख रूपये भाडे कराराअंतर्गत घेतले असल्याचे आता उघड झाले आहे.

कल्याण ग्रामीण मधून निवडून आलेल्या राजू पाटील यांचे बीएजे आरआर हॉस्पिटल आहे. कोरोनाचे सावट वाढताच त्यांनी आपले हॉस्पिटल उपचारासाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याचे जाहीर केले. पण, हॉस्पिटलसाठीचे विजेचे आणि पाण्याचे बिल, ऑक्सिजन पुरवठ्याचा खर्च, उपचाराअंतर्गत येणारे इतर खर्च तसेच रूग्णांचे एक्स रे रिपोर्ट तसेच हॉस्पिटलमधील संपुर्ण कर्मचाऱ्यांचे पगार यासारख्या गोष्टीही कराराअंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केडीएमसी आणि बीएजे सिम्बॉयटिक सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात झालेल्या करारानुसार, जोपर्यंत कोरोना नियंत्रणात येत नाही तोवर हा करार अंमलात असेल. सरासरी तीन महिन्याच्या कालावधीसाठी म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे.

केडीएमसी क्षेत्रात आतापर्यंत १२४ कोरोना पॉझिटिव्ह

केडीएमसी क्षेत्रात आतापर्यंत १२४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये ३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर रूग्णांच्या उपचारासाठी केडीएमसीने हॉस्पिटलमधील बेड्सची शोधाशोध सुरू केली. पण, उपचारासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलची शोधाशोध करण्यापेक्षा मी एकाच ठिकाणी डेडिकेटेड सुविधा पुरवत रूग्णांवर उपचार करावा, असे केडीएमसी आयुक्तांना सुचवले होते. तसेच मी संपुर्ण हॉस्पिटल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही राजू पाटील यांनी त्यांना सांगितले. हॉस्पिटलची सध्या १०० बेडची क्षमता आहे. पण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार फक्त ६५ जणांसाठीच याठिकाणी जागा आहे. याठिकाणी १५ बेड्सचा आयसीयु आहे. तर तीन वेंटिलेटर्स आहेत. सध्या या हॉस्पिटलला महिन्याला १० लाख रूपये देण्यात येत आहेत, असे केडीएमसीच्या आयुक्तांनीही स्पष्ट केले आहे.

राजू पाटील म्हणाले…

सुरूवातीला आमदार राजू पाटील यांनी हॉस्पिटल मोफत देत असल्याचे जाहीर केले. पण आता करारान्वये महिन्यापोटी १० लाख रूपये घेणार असल्याचे करारान्वये स्पष्ट झाले आहे. गेले तीन महिने हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू देखील नव्हते. पण हा एक प्रकारचा वाणिज्यिक करार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पण, असा कोणताही करार झाल्याचे मला माहित नाही. भाडे वसूल करायचेच असते तर १० लाखांपेक्षा अधिक भाडे वसूल करता आले असते. दहा लाख रूपये ही रक्कम अतिशय किरकोळ आहे. आतापर्यंत मी २५ लाख रूपयांचे फक्त धान्य वाटप केले आहे. मी नुसत माझे हॉस्पिलही नियमित सुरू ठेवले असते तरीही मला नक्कीच दहा लाखांहून अधिक रूपये मिळाले असते असाही खुलासा राजू पाटील यांनी केला आहे.


हेही वाचा – नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, २५ झोपड्या जळून खाक