घरमुंबईव्हायरल व्हिडीओ प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वेंनी लिहिले पत्र; हे तर....

व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वेंनी लिहिले पत्र; हे तर….

Subscribe

शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश मात्र यांचा एका रॅलीमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार देखील दाखल केली आहे. पण आमदार प्रकाश सुर्वे हे घटनेच्या दोन दिवसानंतर सुद्धा काहीच बोलले नव्हते. परंतु आता या प्रकरणी प्रकाश सुर्वे यांच्याकडून पत्र लिहिण्यात आले आहे.

शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या संदर्भातील एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यासंबंधी शीतल म्हात्रे यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तर प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी सुद्धा याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात केलेली आहे. पण या प्रकरणाला दोन दिवस उलटून सुद्धा प्रकाश सुर्वे यांच्याकडून कोणतीही भूमिका मांडण्यात आली नव्हती. पण आता प्रकाश सुर्वे यांनी याबाबतचे एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणातील आपले मत व्यक्त केले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणात प्रकाश सुर्वे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, ११ एप्रिल रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हजारो लोकांच्या गर्दीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली झाली. यावेळी प्रचंड गर्दी होती आणि आवाजामध्ये मला माझ्या बहिणीसमान असलेल्या सौ. शीतल म्हात्रे याच कार्यक्रमाबाबत काही सांगत असताना व्हिडिओमध्ये चुकीचं गाणं घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेतून हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रसारित करण्यात आला. अशा प्रकारचं कृत्य हे हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तींची महिलांप्रती असलेली मानसिकता दाखवून देतो.

- Advertisement -

तर विकासकामांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी विरोधकांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. विरोधक हताश झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे व्हिडीओ मॉर्फ करण्यात येत असल्याचे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले आहे. तसेच या व्हिडिओच्या प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबाला मनस्ताप झाल्याचे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. विरोधकांकडून चारित्र्यहनन करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा प्रकाश सुर्वे यांनी केला आहे.

हेही वाचा – नितेश राणे सभागृहात आक्रमक, चौकशीची मागणी

- Advertisement -

दरम्यान, कालच शीतल म्हात्रे यांनी त्यांचा अज्ञातांकडून पाठलाग करण्यात येत असल्याच्या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखलद केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणात आता सागर चव्हाण आणि स्वप्नील माने या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोघेही ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रकाश सुर्वे यांनी माध्यमांना लिहिलेले पत्र

संपादक, सर्व माध्यम प्रतिनिधी,
विषय: श्रीकृष्ण नगर पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमा दरम्यान काढलेल्या रेली
बाबत विरोधकांनी पसरविलेल्या खोटया व्हिडीओ आणि अपप्रचाराबाबत
निवेदन.
महोदय,

मी गेल्या महिन्याच्या 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव व्होकार्ड इस्पितळामध्ये दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चूकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्या जात असल्याने मी हे विस्तृत निवेदन देत आहे.

दिनांक 11.03.२०२३ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून केवळ 10 महिन्याच्या आत माझ्या मागाठाणे विधानसभा मतदार संघामधील विविध प्रश्न आणि समस्या समजून घेत त्यावर प्रशासकिय अधिका-यां सोबत बैठका घेत सर्व प्रश्नांवर तोडगा काढत विविध विकास कामांना मंजुरी देत ती स्वतः जातीने लक्ष देत पूर्ण करुन घेतलेली आहेत. यामध्ये श्रीकृष्ण नगर येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पूल बांधणी वेगाने करून घेतली.

माझ्या मतदार संघातील श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, काजुपाडा, चौगुले नगर, अशोकनगर, नॅन्सी कॉलनी, महिंद्रा कॉलनी व इतर विभागातील हजारो नागरिकांना या पूलाचा फायदा होणार आहे. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 कोटी रुपये मंजूर करून एम.एम.आर.डी.ए अंर्तगत मुंबईमधील प्रथम एक्सीलेटर (सरकता जीना असलेला स्कायवॉक मंजुर केला) हा स्कायवॉक समतानगर ते पोईसर मेट्रो स्टेशनपर्यंत आहे. याचा फायदा समतानगर, सिध्दार्थनगर, ठाकूर कॉम्पलेक्स, वैभव नगर, जानुपाडा व इतर विभागातील हजारो नागरिकांना दररोजच्या प्रवासासाठी होणार आहे.

या दोन मोठया प्रकल्पापैकी एकाच लोकार्पण आणि एकाच भूमीपूजन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिनांक 11.03.2023 रोजी केलं. यावेळी हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी करून हजेरी लावली आणि त्यांच्या कामाप्रती आभार व्यक्त केले.

माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात मी कायम सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे या करिता जीवापाड मेहनत केली. लोकप्रतीनिधी म्हणून प्रशासना सोबत कामांचा पाठपुरवठा करून ती पूर्ण करून लोकसेवेत देणे हे माझे कर्तव्य मानले आहे आणि या कामाच्या जोरावरच आणि जनतेच्या प्रेमामुळेच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले आहे.

सध्या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदारसंघात जोमाने सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या धडाक्यामुळे स्वतःच्या राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीयो मोर्फकरणे खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. यामधून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते सर्वसामान्य लोकांना मात्र त्यांच्यासाठी 24 तास लोकांमध्ये राहून काम करणारे लोकप्रतिनीधी आवडतात आणि लोक त्यांच्यामागे उभे राहतात हा माझा अनुभव आहे.

दिनांक ११.०३.२०२३ रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हजारो लोकांच्या गर्दीच्या उपस्थितीत मा. एकनाथ शिंदे साहेब यांची रेली झाली यावेळी प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणी समान असणा-या माजी नगरसेविका सौ. शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीयोमध्ये चुकिचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडीयो सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला अशाप्रकारचे कृत्य हे हा व्हिडीयो बनविणाऱ्यांची महिलांच्या प्रति असलेली ही मानसिकता दाखवून देते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला दिली आहे. हीच शिकवण स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हीच शिकवण अंगीकारली आहे. या बनावट व्हिडीओ प्रकरणात मुंबई पोलीसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्राबाबत संशयितांना अटक केली आहे.

त्यामुळे तपासातून याबाबतचे सत्य सामोरे येईल अशाप्रकारचे व्हिडीओ पसरवून लोकांचे लक्ष विचलीत करता येईल. मात्र लोकांचे मन जिंकण्याकरिता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करत रहावी लागतात. विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील अशी भी अपेक्षा करतो. या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. ज्या कुणी हा व्हिडीओ बनविला असेल त्यांना परमेश्वर सदबुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

जय महाराष्ट्र
आपला,
प्रकाश सुर्वे, आमदार मागाठाणे विधानसभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -