Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनामुळे जीवन-मरणातील अंतर पाहिले, पालिकेचे सेव्हन हिल हॉस्पिटल ठरले देवदूत- आमदार रवींद्र...

कोरोनामुळे जीवन-मरणातील अंतर पाहिले, पालिकेचे सेव्हन हिल हॉस्पिटल ठरले देवदूत- आमदार रवींद्र वायकर

सेवेन हिल्स हॉस्पिटलला एम्ब्युलन्स देण्याचा घेतला निर्णय

Related Story

- Advertisement -

आपण सर्वतोपरी काळजी घेत असतानादेखील कोरोनाचा संसर्ग होऊन तब्बेत बिघडणं हा अनुभव आता अनेक जणांना येत आहे त्यापैकी मी सुद्धा एक आहे . मला देखील या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला सुरवातीला सात दिवस घरीच गृह विलगिकरणात उपचार केले परंतु नंतर थोडा जास्तच त्रास जाणवू लागल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरु असलेल्या अनेक कोविड सेंटर पैकी माझ्या निवासस्थानाजवळ असलेल्या सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये मी दाखल झालो साधारणतः दहा दिवस मी या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो व पूर्ण बरे वाटल्यानंतर सुखरूप घरी आलो. या दहा दिवसाच्या कालावधीत मी या मनपाच्या कोविड सेंटर मध्ये सुरु असलेल्या सेवेचा साक्षीदार झालो.

या हॉस्पिटलच्या निर्माणापासून माझ्या काही आठवणी आहेत. सेव्हन हिल या नावातच तिरुपतीच्या बालाजी दैवताचे स्थान आहे. ७ शिखरांवर वसलेले श्रीक्षेत्र बालाजी मंदिर डोळ्यासमोर ठेवूनच या सेव्हन हिल हॉस्पिटलचे नाव ठेवलेले असावे कारण या हॉस्पिटलच्या निर्मितीच्या प्रक्रियेत दक्षिण भारतातील लोकं होती व तिरुपती बालाजी म्हणजे दाक्षिणात्य लोकांचे आराध्य दैवत आहे. मी जेंव्हा चार वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी होतो तेंव्हा या हॉस्पिटलच्या बाबतीत अनेक त्रुटी व समस्या आढळून आल्या व त्यावर चर्चा करण्यासाठी अनेकवेळा मनपाच्या आयुक्त, उपायुक्त व अन्य अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली होती. शेवटी अनेक अडचणींवर मात करून एक उत्कृष्ट असे हे भव्य हॉस्पिटल कार्यरत झाले.

- Advertisement -

यापूर्वी सेव्हन हिल हॉस्पिटलच्या कारभाराबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या व त्याबाबत मी नगरसेवक असताना मनपाच्या सभागृहात व आमदार असताना विधिमंडळाच्या सभागृहात आवाज उठवला होता.
मी जेंव्हा या हॉस्पिटलध्ये कोविडच्या उपचारासाठी दाखल झालो तेंव्हा मला तपासण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर्स, औषधे देण्यासाठी येणाऱ्या नर्सेस, सफाई कर्मचारी , वॉर्ड बॉय असे सर्व कर्मचारी किती अदबीने रुग्णांशी वागत असल्याचे पहायला मिळाले . कोरोनाबरोबर जणू त्यांची मैत्री असल्यासारखे ते वावरताना दिसत होते . कुणाच्याही चेहऱ्यावर भीतीचा लवलेश दिसत म्हणता . डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून रुग्णांना उपचार देताना दिसत होते . सिटीस्कॅन , रक्त तपासणे असे जे जे करायचे असते ते ते ताबडतोब होत होते. कोणत्याही औषधांची कमतरता भासत नव्हती.

डॉक्टर्स , नर्स, सफाई कर्मचारी तर चोवीस तास उपलब्ध राहून न थकता काम म्हणजेच रुग्णसेवा करताना दिसत होते . मी काही डॉक्टर्स, नर्स व सफाई कर्मचाऱ्यांना विचारले कि तुम्ही घरी जाता कि नाही ? तेंव्हा कळले कि काही डॉक्टर्स, नर्स व सफाई कर्मचारी तर आठ नऊ महिने त्यांच्या घरी गेलेलेच नाहीत. त्यांना हॉस्पिटलने राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी रहात होते. इथले जेवण तर अप्रतिम असेच होते मला असे वाटत होते कि आपण आपल्या घरचेच जेवण घेत आहोत. सर्वच माझ्याबरोबर आपुलकीने बोलत होते धीर देत होते. हे सर्व मी काही दिवस अनुभवल्यावर मला असे वाटले कि मी एक आमदार व माजी राज्यमंत्री असल्यामुळेच हे सर्व माझ्याबरोबर असे वागून मला विशेष ट्रीटमेंट देत आहेत कि काय ? . जसे माझ्याबरोबर आपलेपणाने वागून माझ्यावर उपचार करत आहेत तसेच या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या सर्व रुग्णांना, नागरिकांनादेखील हे असेच वागणूक देतात काय ? असेच उपचार त्यांनाही मिळतात काय ? हे चाचपून पाहण्यासाठी मी थोडी चौकशी करून व माहिती घेऊन शहानिशा केली. बेडवर असतानादेखील मला लोकांचे फोन यायचे त्याप्रमाणे कुणाला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे , कुणाला व्यक्सीन घेण्यास पाठवणे अशी कामे चालूच होती.

- Advertisement -

दरम्यान मला भेटण्यासाठी सेव्हन हिल हॉस्पिटलचे विशेष सेवा अधिकारी ( OSD) डॉ. महारुद्र कुंभार , अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ, उप अधिष्ठाता डॉ. स्मिता चव्हाण, हॉस्पिटलचे व्यवस्थापनाची बाजू सांभाळणारे श्री शंकर कृष्णमूर्ती, डॉ वरुण देव, सुरक्षा व्यवस्था प्रमुख के पी पिल्ले, सुरेन्द्र कपाल, फ्लोअर मॅनेजर अनुराग गुप्ता, मनोज भोगल, अनिकेत , माझ्या विभागातील शिवसेना उपशाखाप्रमुख जो याच हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अनेक रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करीत असणारा विवेक म्हात्रे आणि इतर वैद्यकीय अधिकारीही यायचे ( इथे मला सगळ्यांचीच नावे लक्षात ठेवणे शक्य नसल्याने जी आठवली ती लिहिली आहेत ) त्यांच्याबरोबर हॉस्पिटलच्या सोयीसुविधांविषयी व त्यांना कोणत्या अडचणी आहेत काय व त्याचे निरसन करण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत माझ्या मनामध्ये आराखडा तयार होत होता. थोड्याच दिवसात मला बरे वाटू लागले .

मी जिथे इतर रुग्ण दाखल होते तेथीलही माहिती घेतली व काही आमदार व नगरसेवक या हॉस्पिटलमध्ये दाखल होते त्यांनाही भेटलो सगळ्यांबरोबर संवाद साधला असता बहुतेकांनी मला या हॉस्पिटलमध्ये फारच उत्तम सोय असल्याचे सांगितले . इथे सर्व रुग्णांना सारख्याच सोयी सुविधा होत्या. काही रुग्ण तर मला म्हणाले कि , साहेब, अशाप्रकारची ट्रीटमेंट घेण्यासाठी जर आम्ही खाजगी रुग्णालयात दाखल झालो असतो तर आमचे लाखो रुपये गेले असते एकाने तर सांगितले कि माझातर जीवच गेला असता कारण उपचारासाठी पैसे उभे करू शकलोच नसतो . इथे तर संपूर्ण मोफत उपचार होत आहेत. असे म्हणून त्यांनी हात जोडून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानले . या हॉस्पिटलच्या स्वच्छतेबाबत मी त्यांना काही सूचना केल्या कारण स्वच्छता हाच खरा उत्तम आरोग्याचा पाया आहे.
खरंच हे हॉस्पिटल म्हणजे दीनदुबळ्यांना एक वरदानच ठरलं आहे . जे बरे होऊन गेलेले रुग्ण आहेत ते आपल्या नातेवाईकांना शेजारीपाजाऱ्यांना जर कोरोना झाला तर याच सेव्हन हिलमध्ये ऍडमिट व्हा असे सांगतात त्यामुळे नवीन रुग्णांना देखील याच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा अट्टाहास दिसून येतो आहे . सगळ्यांनाच सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे असते . बरे होऊन जाणाऱ्यां रुग्णांना पाहून कर्मचाऱ्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटून केलेल्या श्रमाचा क्षीण निघून जातो असेच चित्र दिसून येते.

या सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र आहे तिथेही मी जाऊन आलो . रुग्णांना रांगेत बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था दिसून आली . विशेष म्हणजे ही प्रचंड मोठी रांग हॉस्पिटलच्या इमारतीच्या बाहेर जाते तेंव्हा लस घेण्यास आलेल्या लोकांना उन्हात न बसवता मुख्य गेटजवळ असलेल्या गार्डनमध्ये सुरक्षित अंतरावर खुर्च्या ठेवलेल्या दिसल्या . थंडगार सावलीत रुग्ण बसू शकतात अशी व्यवस्था पाहिली व खरंच हे हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचारी हे रुग्णांना “अतिथी देवो भव ! ” समजून कार्य करत आहेत कि काय असे वाटत होते . अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण सुरळीत चालू होते . एवढी प्रचंड रांग असून देखील कुठेही गडबड गोंधळ दिसून येत न्हवता आणि याचे सर्व श्रेय येथील डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, हॉस्पिटलमधील स्टाफ व विशेष करून सुरक्षारक्षकांना जाते . विशेष सेवा अधिकारी डॉ महारुद्र कुंभार यांच्या कुशल व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या हॉस्पिटलमधील प्रत्येक बाजू खंबीरपणे सक्षम करण्यासाठी डॉ महारुद्र कुंभार हे अथक परिश्रम घेत आहेत. कोरोना येण्यापूर्वी हे हॉस्पिटल इतके लोकप्रिय न्हवते परंतु तेच हे सेव्हन हिल हॉस्पिटल आता कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी देवदूतच भासत आहे

मी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तीन चार दिवसांनी माझ्या कार्यालयात गेलो. जनतेच्या सेवेत रुजू झालो. सेव्हन हिल हॉस्पिटलच्या कार्यात अजून मदत व्हावी यासाठी माझ्या आमदार निधीतून रुपये ५० लाखाचा निधी व एक अद्ययावत  एम्ब्युलन्स मंजूर करून दिली जेणेकरून हॉस्पिटलला आवश्यक असणारी साधन सामुग्री त्यातून घेता येईल व रुग्णांसाठी अजून चांगली सेवा देता येईल. या सेव्हन हिल हॉस्पिटलबरोबरच जोगेश्वरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयासाठी देखील रुपये ५० लाखाचा निधी व एक एम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. लवकरच दोन्ही अंबुलन्स लोकार्पण होतील. या एक करोड रुपयांच्या निधीतून रुग्णांना नक्कीच चांगली सेवा मिळेल याचे समाधानही वाटते.
कोविडच्या संसर्गाने रुग्णालयात दाखल झालो जीवन – मरणातील अंतर किती कमी असते हे जवळून पाहिले. आपणही सर्वांनी शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत रहा व सुरक्षित रहा.


अनुभव – रविंद्र वायकर ( आमदार व माजी राज्यमंत्री )

शब्दांकन – भाई मिर्लेकर


 

- Advertisement -