घरCORONA UPDATECoronavirus War: एमएमसीमुळे सरकारला मिळणार ९ हजार डॉक्टरांची सेवा

Coronavirus War: एमएमसीमुळे सरकारला मिळणार ९ हजार डॉक्टरांची सेवा

Subscribe

एमबीबीएस आणि एक वर्षाची प्रॅक्टिस पूर्ण झालेल्या डॉक्टरांना एप्रिल, मे महिन्यात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे (एमएमसी) नोंदणी करणे आवश्यक असते. या नोंदणीशिवाय त्यांना प्रॅक्टिस करता येत नाही. परंतु सध्या असलेले लॉकडाऊन आणि कोरोनाचा सामना करण्यात व्यस्त असलेल्या या डॉक्टरांना नोंदणी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे तब्बल ९ हजार डॉक्टरांना प्रॅक्टिसपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्याता आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमसीने राज्यातील डॉक्टारांची नोंदणी ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणी वेळेत आणि ऑनलाईन होणार असल्याने डॉक्टरांना त्यांची प्रॅक्टिस कायम ठेवता येणार आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार साडे चार वर्ष शिक्षण पूर्ण करून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यां एक वर्ष प्रॅक्टिस करण्यासाठी परिषदेकडे तात्पुरती नोंदणी करणे आवश्यक असते. तसेच एक वर्ष प्रॅक्टिस झाल्यावर त्यांना कायमस्वरूपी प्रॅक्टिस करण्यासाठी परिषदेकडे पुन्हा नोंद करावी लागते. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून एक वर्ष प्रॅक्टिस करत असलेले ४५०० डॉक्टर हे कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये २४ तास काम करत आहेत. तर २०२० मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण एक वर्षाची प्रॅक्टिस करण्यासाठी ४५०० डॉक्टर सज्ज आहेत.

- Advertisement -

परंतु सध्या कोरोनाने देशात थैमान घातले असल्यामुळे २४ तास हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या डॉक्टरांना कायमस्वरूपी नोंदणी करायला तर दुसरीकडे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिस करण्यासाठी सज्ज असलेल्या डॉक्टरांना लॉकडाऊनमुळे एमएमसीच्या कार्यालयात जाणे शक्य नाही. जर या डॉक्टरांना नोंदणी करणे शक्य न झाल्यास त्यांना कायद्याने प्रॅक्टिस करता येणार नाही व त्यांना घरी बसावे लागेल. मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांची कमतरता भासत असताना फक्त नोंदणी करता न आल्याने तब्बल नऊ हजार डॉक्टरांना घरी बसावे लागणे हे सरकारच्या दृष्टीने सोयीस्कर नाही. ही बाब लक्षात घेऊन एमएमसीने विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी व त्यांना कोरोनाविरीधातील आपली लढाई कायम ठेवता यावी यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात सहभागी असलेल्या डॉक्टरांची सेवा कायम राहण्यास मदत होईल. यामुळे सरकारलाही फायदा होईल, अशी माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.

कशी असेल नोंदणी प्रक्रिया

तात्पुरती आणि कायम स्वरूपी नोंदणी करताना विद्यार्थ्यांना आपल्या कागदपत्रांसोबत एमएमसीच्या कार्यालयात हजर राहावे लागते. परंतु ऑनलाईन नोंदणीसाठी आम्ही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची माहिती घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची माहिती विद्यापीठाने दिलेल्या माहितीसोबत जुळवण्यात येईल. जेणेकरून त्यांना वैयक्तिक तपासणीसाठी एमएमसी कार्यालयात पडताळणीसाठी येण्याची आवश्यकता भासणार नाही.

लॉकडाऊनच्या काळात आम्ही कार्यालय सुरु ठेवले असले तरी राज्यभरातून नोंदणीसाठी मुंबईत येणे शक्य नाही. तसेच डॉक्टर कोरोनाबाधितांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याना नोंदणीसाठी येणे शक्य नाही. नोंदणी झाली नाही तर डॉक्टरना प्रॅक्टिस करता येणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही डॉक्टरांना ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. – शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल

- Advertisement -

 

एमएमसीला ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक असलेला विद्यार्थ्यांचा डेटा आम्ही पाठवला आहे, त्या माहतीच्या आधारे एमएमसी विद्यार्थ्यांची ऑनलाईन पडताळणी करणार आहे. – डॉ. अजित पाठक, परीक्षा निरीक्षक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -