घरमुंबईसंपकाळातही पालिकेचा आरोग्यविभाग ३ दिवस निद्रावस्थेत

संपकाळातही पालिकेचा आरोग्यविभाग ३ दिवस निद्रावस्थेत

Subscribe

मुंबई । प्रतिनिधी

डॉक्टरांच्या मारहाणीनंतर जे.जे रुग्णालयात पुकारण्यात आलेल्या संपाने मुंबईकर हैराण झाले असताना मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तीन दिवस जणू झोपेतच होता. संपकाळात शहरातल्या रुग्णांना द्यायच्या सवेबाबत पालिकेने दुर्लक्ष केले. महत्वाचे म्हणजे पालिकेच्या लोकमान्य टिळक इस्पितळातल्या डॉक्टरांनी सहभाग घेऊनही पालिकेने कुठलीही हालचाल केली नाही. विशेष म्हणजे पालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी असलेल्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव या गावाकडे निघून गेल्या होत्या.

- Advertisement -

का पुकारला होता संप?

राज्य सरकारच्या जे. जे रुग्णालयात शनिवारी डॉक्टरांना मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी संप पुकारला. या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सायन रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जे.जेमध्ये संप सुरु असल्याने रुग्णांनी पालिकेच्या रुग्णालयांकडे मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्णांची गर्दी वाढली. पालिका रुग्णालयांमधील रुग्णांची गर्दी वाढत असताना पालिकेने मात्र कुठलीही स्वतंत्र व्यवस्था केली नाही. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकरता स्वतंत्र ओपीडीही निर्माण करण्यात आली नाही. दरम्यान, याबाबत पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेच्या रुग्णालयात संपाचा कोणताही परिणाम नव्हता, असे ते म्हणाले.

- Advertisement -

आरोग्य अध्यक्षा मुंबईबाहेर

जे. जे रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचे पडसाद पालिकेच्या रुग्णालयात उमटले. सायन रुग्णालयात सोमवारी बंद पाळण्यात आल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले. मंगळवारपर्यंत जे. जेतील आंदोलन सुरूच होते. यामुळे पालिकेच्या रुग्णालयावरील ताण वाढला होता. आरोग्य विभागात संप झालाच तर त्याला तोंड कसे द्यायचे? या नियोजनात असताना मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा मात्र मुंबई बाहेर होत्या. त्या तीन चार दिवसांपूर्वीच गावी खाजगी महत्वाच्या कामानिमित्त गेल्याचे सांगण्यात आले. संप सुरु असताना मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून आरोग्य समिती अध्यक्षा मुंबई बाहेर असल्याने पालिका व राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -