घरताज्या घडामोडी'मला हिंदुह्रदयसम्राट म्हणू नका'; १० मिनिटांत राज ठाकरे बैठकीतून बाहेर!

‘मला हिंदुह्रदयसम्राट म्हणू नका’; १० मिनिटांत राज ठाकरे बैठकीतून बाहेर!

Subscribe

येत्या ९ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाकिस्तान आणि बांगलादेशातील निर्वासितांना भारताबाहेर काढण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात मनसेकडून रंगशारदामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वत: राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सभागृहात गेल्यानंतर अवघ्या १० मिनिटांमध्ये राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडले. त्यामुळे चर्चांना ऊत आला असून थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे ते बैठकीत थांबू शकले नाहीत, असं मनसेतील सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, या १० मिनिटांच्या उपस्थितीमध्ये राज ठाकरेंनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे.

स्थापनेच्या १४ वर्षांनंतर मनसेचं नुकतंच पहिलं महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये राज ठाकरेंनी पक्षाचा बदललेला झेंडा आणि पुढची भूमिका याविषयी पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र, यावेळी काही उत्साही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना ‘हिदुह्रदयसम्राट’ असं म्हणून संबोधलं. मात्र, हे खुद्द राज ठाकरेंना फारसं पटलेलं नाही. त्यामुळेच त्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, ‘मला हिंदुह्रदयसम्राट म्हणू नका. ती उपाधी बाळासाहेब ठाकरेंची आहे’, असं त्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसेकडून बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चाचं नियोजन या बैठकीत केलं गेलं. राज ठाकरे बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आदी मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांनी या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यासोबतच, लवकरच शॅडो कॅबिनेटची घोषणा होऊ शकते, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीच्या आधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -