घरमुंबईबाळासाहेबांच्या जयंतीला मनसे उघड करणार पालिकेतील घोटाळा

बाळासाहेबांच्या जयंतीला मनसे उघड करणार पालिकेतील घोटाळा

Subscribe

मनसेला कोणत्या तरी अज्ञाताने कोरोना काळातील घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत. हे पुरावे मनसे माध्यमांसमोर ठेवणार आहे. याची पोलिसांतही तक्रार करणार आहे. या पुराव्यातून कोणत्या घोटाळ्याचे सत्य बाहेर येईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबईः येत्या सोमवारी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कोरोना काळात महापालिकेत झालेला घोटाळा उघड करणार आहे, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी दिली.

देशपांडे म्हणाले, एक व्यक्ती मनसेच्या शाखेत आली. त्या व्यक्तीने पेन ड्राईव्ह व काही कागदपत्रे शाखेत दिली. त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. तो पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रे बघितली. विरप्पन गॅंगने कोरोना काळात मुंबईची लुट केली. त्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहेत. सोमवारी २३ जानेवारीला ही सर्व माहिती माध्यमांसमोर ठेवणार आहे. पोलिसांत याची तक्रार दिली जाणार आहे.

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही वारंवार कोरोना काळात मुंबई पालिकेत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. अनुभव नसलेल्यांना शंभर कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. याची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. त्यात आता मनसेला कोणत्या तरी अज्ञाताने कोरोना काळातील घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत. हे पुरावे मनसे माध्यमांसमोर ठेवणार आहे. मनसे याची पोलिसांतही तक्रार करणार आहे. या पुराव्यातून कोणत्या घोटाळ्याचे सत्य बाहेर येईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

संदीप देशपांडे यांनी अनेक वेळा शिवसेना, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या मनसेच्या घे भरारी सभेत देशपांडे यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. २५ वर्षात चांगल्या दर्जाचा रस्ता नाही, पण नवीन मातोश्री उभी राहिली, असा आरोप देशपांडे यांनी केला.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३६ हजार कोटी आहे. दरवर्षी आपण २२०० कोटी रुपये खर्च करतो. गेल्या ५ वर्षात आपण १५ हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी खर्च केले. हे रस्ते तुम्हाला दिसताहेत का?, मग हा प्रश्न जेव्हा आपण सत्ताधाऱ्यांना विचारायला उभा राहतो आणि जर तुम्ही १५ हजार कोटी रस्त्यांसाठी खर्च केले असतील, तर आजही रस्त्यात खड्डे कशासाठी?, नवीन रस्ता तयार करणं हे रॉकेट सायन्स नाही. गेल्या २५ वर्षात एकही चांगल्या दर्जाचा रस्ता तयार झाला नाही. परंतु त्याच कालावधीत वांद्रेमध्ये नवीन मातोश्री उभी राहिली. ती सुद्धा अतिशय सुंदर उभी राहिली, असा आरोप देशपांडे यांनी केला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -