आपल्या खंद्या समर्थकावर हल्ला झाल्याचं कळताच राज ठाकरे भेटीला आले अन्…

नेते आणि कार्यकर्त्यांमधलं नातं काही बदललं नाही. याचीच प्रचिती नुकतीच संदीप देशपांडे यांच्याबाबत दिसून आली.

Raj-Thackeray.Sandeep-Deshpande

तसं पहायला गेलं तर राजकारणात नेते आणि कार्यकर्ते हे नातं अगदी जिव्हाळ्याचं…राजकारणात नेत्याच्या मुलापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांवर जास्त प्रेम असतं, असं पूर्वी म्हटलं जायचं. आज सत्ता बदलली, राजकीय वारे उलटे वाहू लागले असले तरी अद्याप नेते आणि कार्यकर्त्यांमधलं नातं काही बदललं नाही. याचीच प्रचिती नुकतीच संदीप देशपांडे यांच्याबाबत दिसून आली.

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना चार अज्ञातांना त्यांच्या रॉड आणि स्टम्पने हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. या घटनेत संदीप देशपांडे यांनी मोठ्या धाडसाने त्या हल्लेखोरांना दमदार उत्तर देत आपला बचाव केला. शिवाजी पार्कमधील लोकांच्या मदतीने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली.

संदीप देशपांडे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या खंद्या समर्थकावर हल्ला झाल्याचं कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ताबडतोब संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी हिंदुजा रूग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, नितेश राणे आदी नेते त्यांच्या भेटीसाठी आले होते. संदीप देशपांडे यांच्यावर उपचार होईपर्यंत राज ठाकरे तिथे हॉस्पिटलमध्येच थांबले. संदीप देशपांडे यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना सोबत घेऊनच राज ठाकरे हे हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसून आले.

हॉस्पिटमधून डिस्चार्ज घेऊन संदीप देशपांडे बाहेर येताना ते व्हिलचेअरवर बसून येताना दिसले. त्यांच्या आजूबाजूला मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. संदीप देशपांडे यांना घरी सोडवण्यासाठी राज ठाकरेंनी आपली गाडी सुद्धा देऊ केली. आपल्या गाडीतून संदीप देशपांडे यांना सुखरूप सोडवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले. संदीप देशपांडे व्हिलचेअरवरून हळूहळू राज ठाकरेंच्या गाडीच्या दिशेने जात असताना राज ठाकरे मात्र मागे उभे होते. प्रत्येक वेळी आपल्या आंदोलनाने आणि आक्रमकतेने दरारा निर्माण करणाऱ्या खंद्या समर्थकाला अशा अवस्थेत पाहून राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर काहीशी निराशा दिसून आली होती.

नेत्याने सर्वांना सोबत घ्यायचे, अडी-अडचणीच्या काळात मदत करायची. सुख-दुःखात सोबत करायची. मग कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी काम करायचे, प्रत्येकवेळी नेत्याने आवाज दिला की हजर राहायचे. आतापर्यंत चालत आलेली ही पद्धत आजही जिवंत आहे, हे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रसंगी दिसून आली.