घरमुंबईठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात हत्या

ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात हत्या

Subscribe

मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची दिवसाढवळ्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी राबोडी परिसरात घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिलेला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळ्या झाडूनच हत्या झाली असून ही हत्या क्लस्टरच्या वादातून करण्यात आली असल्याचा आरोप ठाणे जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. अंबरनाथ येथे मनसेचे नेते राकेश पाटील यांच्या हत्येला महिना उलटत नाही तोच ठाणे शहरातील मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची अज्ञाताकडून गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे ठाणे शहर हादरले आहे.

- Advertisement -

ठाणे शहरातील मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख हे सोमवारी दुपारी नमाज अदा करून ठाण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयाकडे मोटारसायकल वरून जात होते. राबोडी मार्केट, जामा मस्जिद येथे मोटारसायकलवरून शेख यांचा पाठलाग करणार्‍या दोघांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. त्यामुळे शेख मोटारसायकलवरून खाली कोसळले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळावर पोलिसांना काहीही पुरावे मिळून न आल्यामुळे जमील शेख यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये जमील शेख यांची हत्या स्पष्ट दिसत होती. जे.जे. रुग्णालयाकडून शेख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे निदान होईल, अशी माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

- Advertisement -

जमील शेख यांच्यावर २०१७ मध्ये देखील हल्ला झाला होता. मात्र अद्याप या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली नसल्याचे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले. जमील शेख यांचा ठाण्यात राबवण्यात येणार्‍या ’क्लस्टर’ योजनेला विरोध होता. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -