Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई पंच बॅग...

पंच बॅग…

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालेे. ईदनंतर ज्या मशिदींवरील भोंगे उतरवले जाणार नाहीत, त्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात स्पीकरवरून हनुमान चालीसा वाजवण्यात यावी, असा आदेश त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील हिंदू धर्मियांना दिला. राज ठाकरे यांनी फक्त मशिदींवरीलच नव्हे, तर हिंदूंच्या देवळांवरील भोंगेही उतरवले जावेत, असेही म्हटले होते. त्याचे पडसाद पहिल्यांदा उत्तर प्रदेशात उमटले. त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार तेथील भोंगे उतरवण्यात आले. त्याला तेथील इमाम, मुल्ला, मौलवींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर इथल्या काही हिंदू मंदिरांवर जे अनधिकृत भोंगे होते, तेही उतरविण्यात आले.

आता हीच प्रक्रिया देशातील इतर राज्यांतही कमी जास्त प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मशिदी आणि मंदिरांवरील भोंग्यांचा विषय ध्यानीमनी नव्हता. इतकेच नव्हे तर राज ठाकरे हे आपल्या विरोधात भूमिका घेऊन अचानक भोंग्यांचा विषय पुढे आणतील, तसेच अगदी मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटमपर्यंत पोहोचतील याची सत्ताधारी नेत्यांना कल्पना नव्हती. त्यात पुन्हा धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरविण्यात यावेत, तसेच परवानगी घेण्यात आलेल्या भोंग्यांना वेळेची आणि आवाजाची मर्यादा असावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने याअगोदरच दिलेला आहे, पण तो विशेषत: मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील म्हणून यापूर्वी सत्तेत आलेल्या सरकारांनी शीतपेटीत टाकलेला होता. त्यात भाजपचाही समावेश आहे.

- Advertisement -

मशिदींवरील मोठा आवाज करणारे भोंगे उतरविण्यात यावेत, अशी आमची अगोदरपासून मागणी होती, असे भाजपचे नेते हलक्या आवाजात म्हणत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे एक नेते मोहित कंबोज यांनी तर काही हजार भोंगे विकत घेऊन ते देशभरातील हिंदू देवळांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. भोंगे मग ते कुठलेही असोत, मशिदींवरील असोत अथवा मंदिरांवरील असोत, अथवा इतर धर्मस्थळांवरील असोत, त्यांच्या आवाजाचा जर परिसरातील लोकांना त्रास होत असेल तर त्यावर मर्यादा आणण्याची गरज आहे, ही एक सर्वसाधारण भावना असते. मग तो कुठल्याही धर्माचा माणूस असूदे. आवाज जर प्रमाणाच्या बाहेर आणि दिवसातून बरेचदा तसेच अवेळी येणार असेल तर त्याचा त्रास होणारच. बरेचदा असे होते की आपण ज्या धर्माचे आहोत, त्याच्या धर्मस्थळातून आवाज येत असेल तर ते आपल्याला रुचत नसले तरी आपण ते नाईलाजास्तव सहन करतो.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर अलीकडच्या काळात मुस्लिमांचे नेते म्हणून आक्रमकपणे पुढे येऊ पाहणारे एमआयएमचे नेेते आणि अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी सुरुवातीला स्वत: शांत राहणे पसंत केले. इतकेच नव्हे तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज यांच्या अल्टिमेटमवर कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन केले. ओवेसी यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जाते. कारण ओवेसी बंधूूंनी एमआयएम हा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी अनेकदा आक्रमक विधाने केलेली आहेत. त्यावरून देशभरातून विशेषत: हिंदू संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानांवर तर ओवेसी बंधू आपली बेधडक प्रतिक्रिया देत असतात. भारत माता की जय, ही संघाची घोषणा असेल, पण आमच्या मानेवर सुरी फिरवली तरी आम्ही त्यांची जबरदस्ती मान्य करणार नाही, असे जाहीर सभांमधून त्यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भोंगे उतरवण्यावर ओवेसी बंधू काय बोलतात याला विशेष महत्त्व होते.

- Advertisement -

सुरुवातीला शांत राहिलेल्या असदुद्दिन ओवेसी यांनी काही दिवसांनंतर भोंग्यांच्या विषयावर आपली संयमित भूमिका मांडली. हा दोन भावांमधील विषय आहे. त्यात आपण पडण्याचे कारण नाही, पण आम्ही कुणाच्या राजकारणासाठी मुस्लिमांचा ‘पंच बॅग’ म्हणून वापर होऊ देणार नाही. ओवेसी यांनी वापरलेला ‘पंच बॅग’ हा शब्द अतिशय मार्मिक आणि अर्थपूर्ण आहे. त्याला सखोल असा अर्थ आहे. कारण भारतातील मुस्लिमांचा मोठ्या पक्षांकडून एकगठ्ठा मतांसाठी वापर केला जातो असे अनेक वेळा दिसून आले आहे. कारण भारतात मुस्लीम समाज हा हिंदूच्या तुलनेने संख्येने कमी आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. गरिबीचे मोठे प्रमाण आहे. बहुसंख्य मुस्लीम समाज हा धार्मिक नेते, इमाम, मुल्ला, मौलवी यांच्या प्रभावाखाली आहे. त्यामुुळे अनेकांना आपली स्वतंत्र मते मांडता येत नाहीत. मुस्लिमांमध्ये सुधारणावाद रुजवणारे लोक कार्यरत आहेत, पण त्यांची संख्या फारच कमी आहे.

मुस्लिमांमध्ये कालसुसंगत सुधारणा व्हाव्यात यासाठी पत्रकार आणि विचारवंत हमीद दलवाई यांनी १९७० साली मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. समान नागरी कायदा, मुस्लीम तलाकपीडित महिलांचे प्रश्न, कुटुंब नियोजन, मुस्लीम समाजाला केवळ धर्माधिष्ठित शिक्षणापासून मुक्त करून त्यांना आधुनिक शिक्षणाकडे वळवणे, जगभरातील अनेक ज्ञानशाखा त्यांच्यासाठी खुल्या करणे, अशा प्रकारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी मंडळाचे कार्य चालते. या सत्यशोधक मंडळाचा महाराष्ट्रात काही प्रमाणात प्रभाव आहे. अन्य काही राज्यांमध्ये या मंडळाचे कार्य सुरू असले तरी त्याचा प्रभाव खूपच कमी आहे. हिंदू धर्मामध्ये अनेक समाजसुधारक निर्माण झाले. त्यांनी केलेल्या समाज सुधारणांचा लोकांनी स्वीकार केला. त्यामुळे अनेक कालबाह्य रुढी परंपरांमधून हिंदू समाजाची मुक्तता झाली.

असदुद्दिन ओवेसी जेव्हा असे म्हणतात की, आम्ही इथल्या मुस्लिमांना ‘पंच बॅग’ होऊ देणार नाही, तेव्हा त्यांनी मुस्लीम समाजातील सुधारणावाद्यांना किती वाव मिळतो याचाही विचार करायला हवा. कारण जोपर्यंत समाजामध्ये कालसुसंगत सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत तो कुणाची तरी पंच बॅग म्हणूनच वापरला जाणार आहे. बरेचदा धार्मिक आणि राजकीय नेते हे समाजाचा उपयोग स्वत:ला प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी करतात. समाजाला सुधारणावादाची कास धरू न देता तो पारंपारिक गोष्टींमध्ये अडकून राहील याचा प्रयत्न करत राहतात. केवळ लोकसंख्या वाढवून प्रभाव वाढत नाही. त्यासाठी गुणवत्ता वाढवावी लागते. राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय काढला, त्यानिमित्ताने अनेक गोष्टी पुढे येत आहेत. त्याचा समोपचाराने विचार व्हायला हवा.

- Advertisment -