मनसे आक्रमक! मुंबईतील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी केले अनोखे आंदोलन

mns protest front of bmc office for mumbai potholes
मनसे आक्रमक! मुंबईतील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी केले अनोखे आंदोलन

मुंबई महापालिका निवडणूक जवळ आलेली असताना मनसे अधिक आक्रमक झाली आहे. मनसेने मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येकडे मुंबईकरांचे आणि पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालिका मुख्यालयासमोरील ‘सेल्फी पॉईंट’ येथे रस्त्यांवरील खड्डयांचे फोटो काढून आणि त्यांचे प्रदर्शन मांडून त्या खड्ड्यांची (प्रतिकात्मक) ५०% सवलतीच्या दरात विक्री करण्याबाबतचे आंदोलन मनसे नेते योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली.

मुंबईत रस्ते कामांसाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खराब होतात. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडतात. हे खड्डे बुजविण्यासाठीसुध्दा पालिका काही कोटी रुपयांचा खर्च करते. मात्र तरीही दरवर्षी खड्ड्यांच्या समस्येने मुंबईकर हैराण होतात. मात्र हे खड्डे वेळीच बुजविण्यात पालिका प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो. परिणामी खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवित हानीही होते.

त्यामुळे या खड्ड्यांबाबत गुरुवारी मनसेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. दसऱ्याच्या मुहूर्तावर खड्डे ५०% सवलतीच्या दरात विकत असून यामध्ये, मुख्यमंत्री आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घराजवळील खड्ड्यांचाही समावेश असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – राज्य सरकारची आमदारांना दसऱ्याची भेट; आमदार निधी चार कोटींवर