आता रुग्णांच्या सेवेसाठी टॅक्सी रुग्णवाहिका; महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा प्रस्ताव

रुग्णांच्या सेवेसाठी टॅक्सी रुग्णवाहिका सुरु करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने महापालिके समोर मांडला आहे.

BMC
मुंबई महानगरपालिका

बेस्ट बसेस आणि एस.टी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकांमध्ये करण्यात आल्यानंतर आता बाधित रुग्णांना रुग्णलयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची भासणारी कमतरता लक्षत घेता रिक्षा आणि टॅक्सींचे रुग्णवाहिकांमध्ये रुपांतर करण्याचा विचार सुरु आहे. मुंबईत सुरुवातील सुमारे ४५० टॅक्सी रुग्णवाहिका सेवेसाठी देण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने दर्शवली आहे. मात्र, महापालिकेच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून या टॅक्सी रुग्णवाहिका सेवा रुग्णांसाठी दिली जाणार आहे.

खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूट

मुंबईतील सर्व खासगी रुग्णवाहिकांच्या सेवा बंद असून काही खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूट सुरु असल्याने रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने टॅक्सी आणि रिक्षा रुग्णवाहिकेचा पर्याय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनला दिला आहे. याबाबत टॅक्सी रुग्णवाहिकेचा प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी महापालिकेला दिला. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर तसेच सुनील सरदार आदींनी टॅक्सी रुग्णवाहिकेची पाहणी केली.

४५४ टॅक्सी उपलब्ध करून देण्याची तयारी

वाहतूक सेनेने प्रत्येक नगरसेवक प्रभागामागे दोन याप्रमाणे ४५४ टॅक्सी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये टॅक्सीचे रुग्णवाहिकेमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. यासाठी चालकाच्या मागील बाजूस प्लास्टिक पडदा स्वरुपात शिट लावली जाईल. ही सेवा महापालिकेने मोफत देण्याची सूचना केली आहे. परंतु, यासाठी येणारा खर्च तसेच त्यावर होणारा सीएनजी खर्च याशिवाय दैनंदिन सॅनिटायझेन आदींचा प्रश्न आहे. परंतु, ही सेवा रुग्णांना देताना याचा विचार केला जाणार नाही. प्रत्येक नगरसेवक दोन याप्रमाणे नगरसेवक संख्येनुसार टॅक्सी रुग्णवाहिका विभाग कार्यालयात उभ्या केल्या जातील आणि नागरिकांच्या मागणीनुसार ही सेवा जनतेला मोफत दिली जाईल. पण, महापालिकेच्या काही अटी आहेत, त्यासंदर्भात चालकांशी चर्चा करून दोन दिवसांमध्ये याबाबत अंतिम प्रस्ताव सादर केला जाईल आणि त्यांनी मंजुरी दिल्यास त्वरीत या टॅक्सी रुग्णवाहिका सुरु केल्या जातील, असे संजय नाईक यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णाला टॅक्सीने नेताना पोलिसांनी चालकाला सोडले. परंतु, रुग्णाला सोडून आल्यानंतर त्या चालकावर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे या टॅक्सीचा वापर रुग्णवाहिका म्हणून करण्याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केला,असेही संजय नाईक यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – खुशखबर! धारावीत दिवसभरात केवळ १८ बाधित रुग्ण!