कलर्स वाहिनीवर सुरू असलेला Bigg Boss हा Reality Show आता मनसेच्या हिट लिस्टवर आला आहे. आणि याला कारण आहे या शोमधला एक स्पर्धत जान सानू. जान सानूनं शोमधल्या एका सीनमध्ये मला मराठी भाषेची चीड येते, असं म्हटल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. जान सानूच्या या वक्तव्यानंतर मनसेनं त्याच्यावर कडव्या शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘त्याला मुंबईत काम कसं मिळतं, याची खबरदारी घेतली जाईल’, असा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यानंतर आता मनसेकडून थेट Colors वाहिनीलाच २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत जर कारवाई झाली नाही, तर खळ्ळखट्याक् करण्याचा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
मुंबईत फक्त मराठी माणसाचाच माज!
अमेय खोपकर यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांनी इशारा दिला आहे. ‘जर २४ तासांच्या आत बिगबॉसने, कलर्सने आणि जान सानूने महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागितली नाही, तर उद्यापासून मुंबईत जे बिग बॉसचं शूटिंग सुरू आहे, ते आम्ही बंद पाडू आणि त्यांचा शो आम्ही चालू देणार नाही. मुंबईत राहायचं असेल, तर मराठी भाषेचा सन्मान तुम्हाला करावाच लागेल. मराठी येत नसेल, तर मुंबईच्या बाहेर चालतं व्हायचं. यापुढे जान सानूला मुंबईत काम कसं मिळतं, याची खबरदारी घेतली जाईल. मुंबईत आणि महाराष्ट्रात माज हा मराठी माणसाचाच चालेल. बाकी कुणीही येऊन दादागिरी करायची नाही’, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.
@mnsadhikrut @abhijitpanse @BalaNandgaonkar @1nitinsardesai @rajupatilmanase @avinash_mns @AviAbhyankarMNS @Viacom18Studios pic.twitter.com/2PyAIPUdDR
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
काय आहे वाद?
प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान सानू Bigg Boss च्या १४व्या सीजनमध्ये एक स्पर्धक आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री आणि स्पर्धक निक्की तांबोळी त्याच्याशी मराठीतून बोलू लागल्यानंतर जान सानू संतप्त झाला आणि त्यानं वरील वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘माझ्याशी मराठी भाषेतून बोलू नकोस. मला चीड येते. बोलायचं असेल तर हिंदीतून बोल नाहीतर बोलू नकोस’, असं तो म्हणाला.