नॉट रिचेबल असलेल्या वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली असून त्यात ते तिरुपती बालाजीला असल्याचे सांगितले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचे अल्टीमेटम दिले होते. त्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झाली असून राज यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मनसेचे नेतेही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मात्र यादरम्यान मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे दोन्ही नेते मात्र कुठेही दिसले नाहीत. यामुळे अनेकांनी त्यांना संपर्क केला असता दोघांचेही नंबर नॉट रिचेबल होते. पण वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली असून त्यात ते तिरुपती बालाजीला असल्याचे सांगितले आहे.

पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. तसेच सध्या मी माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत बोललो त्यांनी माझी विनंती मान्य केल्याचे मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटले असून त्यांनी भोंग्यविना नमाज केल्याचे आणि भविष्यात सहकार्य करण्याचे सांगितल्याचे मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच प्रभागातील मुस्लिम बांधवांचे मोरे यांनी हार्दीक आभार मानले आहेत.

राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. कारण मोरेंकडे जे शहराध्यक्षपद होते त्या वार्डात मुस्लिम मतदार अधिक असून मोरेंबरोबर सगळ्यांचे मैत्रीपूर्व संबंध आहेत. यामुळे भोंग्याविरोधात भूमिका घेऊन त्यांना नाराज करणे मोरे यांना रुचले नाही. यामुळे त्यांना शहराध्यपद सोडावे लागले. त्यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आले. पण भोंग्याविरोधात मनेस आक्रमक झाल्यापासून बाबर आणि मोरे दोघेही नॉट रिचेबल होते.