घरमुंबईमोनो रेलची  क्रेझ घसरली

मोनो रेलची  क्रेझ घसरली

Subscribe

दररोज ५ हजार प्रवाशांची घट, उत्पन्नही घटले

डब्यांना लागलेल्या आगीमुळे बंद पडलेली मोनोे रेल अनेक अडथळे पार करत मुंबईकरांच्या सेवेत पुन्हा आली खरी, पण  प्रवाशांना इम्प्रेस करण्यात तिला सपशेल अपयश आले. दर दिवशी मोनोरेलच्या तब्बल ५ हजार प्रवाशांची घट होत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. ९ महिन्यांनंतर सुरू झालेल्या मोनो रेलचे ३० टक्के प्रवासी कमी झाले आहेत. यामुळे रुळावर आलेल्या ‘मोना डार्लिंग’ची क्रेझ घसरली असेच सिद्ध झाले आहे.
मोनो रेलची सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली. वडाळा ते चेंबूर या टप्प्यात दर दिवशी मोनोच्या १३० फेर्‍या सुरू झाल्या. सप्टेंबरमध्ये मोनोच्या 3900 फेर्‍या झाल्या. संपूर्ण महिन्यात मोनोने प्रवास करणार्‍यांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे. मोनो रेलच्या मैसुर कॉलनी या स्थानकात डब्याला पहाटे आग लागल्यानंतर नोव्हेंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत मोनोची सेवा बंद ठेवण्यात आली होती. १ सप्टेंबरपासून मोनो सुरू झाली, तेव्हापासून प्रवाशी संख्या झपाट्याने घसरत आहे.

अशी घटली प्रवासी संख्या

फेब्रुवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत मोनोरेलने प्रवास करणार्‍या प्रवाशांची दैनंदिन संख्या १५ हजार इतकी होती. पण मोनो १ सप्टेंबरपासून नव्याने सुरू झाल्यापासून ही संख्या सरासरी ५ हजार प्रवाशांनी घटली आहे. पहिल्याच महिन्यात दिवसाला अवघ्या १० हजार प्रवाशांनी मोनोने प्रवास केला. सप्टेंबरमध्ये मोनोने प्रवास करणार्‍यांची संख्या ३ लाख ४ हजार ६३० इतकी आहे. मोनोमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ऑगस्ट महिन्यात २१ लाख ४१ हजार रूपये इतका महसूल मिळाला आहे. एमएमआरडीएने ३० लाख रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज बांधला होता. पण तितका महसूलही या तिकिटांच्या उत्पन्नातून मिळालेला नाही. त्यामुळे मोनोच्या अवघ्या २१ लाख रूपयांच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे.

तिकीट दरवाढ लवकरच 

मोनोच्या उत्पन्नवाढीसाठी एमएमआरडीएमार्फत तिकीट दरवाढीचा प्रस्ताव आहे. महसूल वाढीसाठी एमएमआरडीएने हा प्रस्ताव मांडला आहे. पण वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानचा टप्पा सुरू होत नाही, तोवर तिकीट दरवाढ होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आताच तिकीट दरवाढ झाली तर महसूल आणि प्रवासी संख्येत आणखी घट होईल, त्यामुळे तिकीट दरवाढीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

प्रवासी घट कशामुळे

आगीच्या घटनेने मोनोची सेवा खंडित झाली आणि जवळपास ९ महिन्यांचा कालावधी उलटला म्हणून प्रवासी संख्या घटली हे मुख्य कारण समोर येत आहे. शाळकरी विद्यार्थी, ऑफिसला जाणारा कामगारवर्ग तसेच रहिवासी मोनोचा वापर करत होते. पण ९ महिन्यांच्या कालावधी  नंतरही प्रवाशांना पुन्हा आकर्षित करण्यात मोनोला यश आलेले नाही.
चेंबूर – वडाळा 
सध्याचे दर
५ रूपये, ७ रूपये,
९ रूपये, ११ रूपये
प्रस्तावित दर
१० रूपये, २० रूपये,
३० रूपये, ४० रूपये
मोनो रेल ही चेंबूर विभागाची गरज आहे. त्यामुळेच हा प्रकल्प आम्ही तातडीने पुन्हा सुरू केला आहे. मोनो रेल सुरू झाल्यापासून मोनोतून प्रवास करून प्रवाशांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे. आगामी काळात प्रवासी संख्या नक्कीच वाढेल.
– दिलीप कवठकर , 
प्रवक्ता, एमएमआरडीए
Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -