घरमुंबईमुंबईत दरड दुर्घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी अंमलबजावणी

मुंबईत दरड दुर्घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी अंमलबजावणी

Subscribe

महापालिका म्हाडा, जिल्हाधिकारी यांना सुरक्षिततेचा आराखडा बनवून देणार

मुंबईसह राज्यातील काही डोंगराळ, टेकडी परिसरात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडून त्यामध्ये मोठी जीवित व वित्तीय हानी झाली. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक बाबींची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आणि २४ तास सतर्क राहण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी पालिकेसह सर्व प्राधिकरणांना दिले आहेत. तसेच, मुंबईतील विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, कुर्ला, चेंबूर, मालाड आदी महत्वाच्या २० ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना अधिक प्रमाणात घडण्याची शक्यता आहे. मुंबईतील बहुतांश डोंगराळ, टेकडी भाग हा जिल्हाधिकारी यांच्या तर काही भाग म्हाडा, महापालिका यांच्या अखत्यारित आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना काय असाव्यात याबाबतचा एक ‘कृती आराखडा’ मुंबई महापालिका तज्ज्ञांच्या मार्फत बनवून जिल्हाधिकारी व म्हाडा यांना लवकरच सादर करणार आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास आयआयटी पवई यांसारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर, विक्रोळी येथे काही दिवसांपूर्वीच भिंत, दरड कोसळून मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली होती. त्यानंतर राज्यातील महाड, चिपळूण आदी परिसरातही दरड दुर्घटना घडून त्यामध्येही मोठ्या प्रमाणात जीवित, वित्तीय हानी झाली. या दुर्घटनांनंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी घटनास्थळांची पाहणी करून राज्य शासन, मुंबई महापालिका प्रशासन यांच्यावर तोफ डागली होती. शासकीय व प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरड दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व यापुढील काळात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने शहर व उपनगरातील दरड कोसळण्याची संभावना असलेल्या सर्व ठिकाणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेली ‘मिड मान्सून’ आढावा व समन्वय बैठक पालिका मुख्यालयात शुक्रवारी पार पडली.
या बैठकीला मुंबई महापालिकेच्या शहर व उपनगरे या दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये चांगला समन्वयन साधला जात आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विषयक सुनिशिचित कार्यपद्धतींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात यावी. त्याचबरोबर दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबंधात्मक बाबींची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेशही मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी या बैठकीदरम्यान सर्व संबंधित प्राधिकरणांना दिले.

- Advertisement -

याप्रसंगी, पालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई शहर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनीही मार्गदर्शन केले. तसेच संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी या बैठकीचे समन्वय व सूत्रसंचालन केले तर महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे याही उपस्थित होत्या. वास्तविक, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात घडणाऱ्या संभाव्य दुर्घना पाहता आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे नियमितपणे आढावा व समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येत असते. पालिका आयुक्त हे मुंबईतील सर्व प्राधिकरणांना पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आवश्यक त्या सूचना देत असतात.

मुंबईत २९१ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता

मुंबईतील वाशी नाका, विक्रोळी पार्कसाईट येथे भिंत, दरड कोसळण्याच्या दुर्घटना नुकत्याच घडल्या आहेत. मुंबईत २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका संभवतो. यामध्ये, भांडुप विभागात डोंगराळ भाग जास्त असल्याने १५२ ठिकाणी धोका सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ घाटकोपर -३२ ठिकाणी, त्यानंतर कुर्ला विभागात -१८ ठिकाणी, वाशीनाका – ११ ठिकाणी तर वरळी परिसरात – १० ठिकाणी जास्त धोका आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -