Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मीरा रोडमध्ये दोन गतिमंद मुलांसह आईची आत्महत्या

मीरा रोडमध्ये दोन गतिमंद मुलांसह आईची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरेंद्र पार्क परिसरातील एकाच घरात आईसह, मुलगा आणि मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. तिघांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नसरीन वाघू (वय ४३), मुलगी सदफ नाझ वाघू (वय २०) व मुलगा मोहम्मद अर्श वाघू (वय १२) अशी त्यांची नावे आहेत. नसरीन यांची दोन्ही मुले गतिमंद होती.

नसरीन वाघू यांचा एक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तेव्हापासून त्या त्यांच्या वडिलांकडे मीरा रोड परिसरातील जुही इमारत सी- २, नरेंद्र पार्क, नयानगर ह्या इमारतीत रुम नंबर ३२ मध्ये त्यांच्या दोन मुलासह राहत होत्या. त्यांची मुलगी सदफ नाझ वाघू व मुलगा मोहम्मद अर्श वाघू हे गतिमंद होते. आई व या मुलांमध्ये सतत वाद होत असत. सोमवारी रात्रीदेखील थंड पेय पिण्यावरून त्यांच्यात वाद झाला. नसरीन यांचे वडील रात्री बेडरूममध्ये झोपण्यास गेले. आई व मुले हे तिघे हॉलमध्ये झोपलेले होते. सकाळी नसरीन यांचे वडील सकाळी उठून हॉलमध्ये आले असता त्यांना तिघेही निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तिघांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते मृत झाल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी नयानगर पोलिसांना दिली.

- Advertisement -

नयानगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले. नसरीन यांचे वडील बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्यानंतर रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास नसरीन यांनी मुलांना व स्वतः झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. तपासात हॉलमध्ये झोपेच्या गोळ्यांचे पॅकेट आढळून आले आहे. त्यावरून पोलिसांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. नसरीन यांची मुलगा व मुलगी हे दोघेही गतिमंद असल्यामुळे व त्यांचा घटस्फोट झाल्यामुळे त्या नेहमी तणावात असत. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

- Advertisement -