संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्व राजकीय पक्ष आणि विधानसभा सदस्यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. 

आगामी राज्यसभा निवडणुकीत शिवसेना दोन उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र, चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्व राजकीय पक्ष आणि विधानसभा सदस्यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.  त्याशिवाय ते विविध पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर त्यांनी गुरूवारी  उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

संभाजीराजे यांना शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे असेल, तर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आजच्या भेटीबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला असला तरीही राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठीच ही भेट असल्याचे बोलले जाते.