घरक्राइमदिवाळीसाठी बँकेतून पैसे काढले आणि काही तासांत लुटले गेले!

दिवाळीसाठी बँकेतून पैसे काढले आणि काही तासांत लुटले गेले!

Subscribe

दिवाळीसाठी बँकेतून काढलेली रक्कम घरी घेऊन जाण्यासाठी निघालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शहाड रेल्वे स्थानकात दोन शस्त्रधारी इसमांनी शस्त्राचा धाख दाखवून लुटल्याची घटना नुकतीच शहाड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वर घडली. लुटारूंनी या कर्मचाऱ्याकडून मोबाईल फोन आणि २० हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वाढत्या गुन्ह्यांमुळे प्रवाश्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिटवाळा येथे राहणारे संजय शिर्के (४०) हे महावितरणच्या कल्याण येथील कार्यालयात कामाला आहेत. ९ नोव्हेंबर रोजी संजय शिर्के हे सायंकाळी कल्याण येथील बँकेतून दिवाळीसाठी २० हजार रुपये काढून घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, संजय शिर्के हे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहाड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वर टिटवाळा येथे जाण्यासाठी ट्रेनची वाट पहात उभे होते. दोन शस्त्रधारी इसम शिर्के यांच्या पाठीमागून आले आणि त्यांनी शिर्के यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील मोबाईल फोन काढत असताना त्यांनी विरोध केला असता एकाने शिर्के यांना पाठीमागील पकडले व दुसऱ्याने त्यांच्या खिशातील मोबाईल फोन, २० हजार रुपयांची रोकड आणि कानातील सोन्याची बाळी असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. शिवाय प्रवासी संजय शिर्के यांना फलाटावरून खाली लोटून दोघं लुटारूंनी तेथून पळ काढला. रात्री खूप उशीर झाल्यामुळे संजय शिर्के हे तसेच घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली.

- Advertisement -

या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून चोरी, जबरी चोरी सारखे गुन्हे दररोज घडत आहेत. कल्याण रेल्वे स्थानक सोडले तर इतर रेल्वे स्थानकांवर पोलीस दिसून येत नसल्यामुळे चोरट्यांकडून या स्थानकावर लूटमार सुरु असते. शहाड येथे घडलेल्या घटनेच्या दिवशी देखील फलाटावर एकही पोलीस अंमलदार हजर नसल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -