मुलुंडच्या आगीत ८० जणांची सुटका तर १० जखमी

मुलुंड (पश्चिम), सेवालाल लालवाणी रोड, विठ्ठल नगरमधील तळमजला अधिक सात मजली जागृती सोसायटीमध्ये बुधवारी दुपारी २.५५ वाजताच्या सुमारास तळमजल्यावर असलेल्या कॉमन वीज मिटर बॉक्समध्ये अचानकपणे आग लागली. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक केबल, वीज मिटर, स्वीचेस आदींना आग लागली होती.

मुंबईः मुलुंड (पश्चिम) लालवाणी रोड येथे विठ्ठल नगरमधील सात मजली जागृती सोसायटीमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास कॉमन वीज मिटर बॉक्समध्ये अचानकपणे आग लागली. या आगीत वरच्या मजल्यापर्यंत गेलेली इलेक्ट्रिक केबल जळाली. सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे इमारतीत अडकलेल्या ८० रहिवाशांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. मात्र त्यापैकी १० जणांना धूर नाकातोंडात गेल्याने श्वसनाचा त्रास झाला. नजीकच्या अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अग्निशमन दलाने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून अवघ्या १४ मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली. पुढील अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, मुलुंड (पश्चिम), सेवालाल लालवाणी रोड, विठ्ठल नगरमधील तळमजला अधिक सात मजली जागृती सोसायटीमध्ये बुधवारी दुपारी २.५५ वाजताच्या सुमारास तळमजल्यावर असलेल्या कॉमन वीज मिटर बॉक्समध्ये अचानकपणे आग लागली. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक केबल, वीज मिटर, स्वीचेस आदींना आग लागली होती.

इलेक्ट्रिक वायर, केबल लाईनला आग लागल्याने आणि ते जळाल्याने आगीचा काळाकुट्ट धूर संपूर्ण इमारतीमध्ये पसरला होता. या आगीची माहिती मिळताच इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली. आगीमुळे इमारतीमधील फ्लॅट, लॉबी, टेरेस, जिन्यावर लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी जवळजवळ ८० रहिवाशी इमारतीत अडकून पडले होते. मात्र या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू करून ८० जणांची सुखरूप सुटका केली. त्यापैकी १० जणांना आगीचा काळाकुट्ट धूर नाकातोंडात गेल्याने धुराची बाधा झाली. या १० जणांमध्ये, ३२ ते ६३ वयोगटातील ७ महिला, ४ ते १० वयोगटातील २ मुली व १ मुलगा अशा ३ मुलांचा समावेश असून त्यांना तात्काळ नजीकच्या अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

इमारतीच्या परिसरात आगीची घटना बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून अवघ्या १४ मिनिटात म्हणजे दुपारी ३.०९ वाजता या आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग का कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

आगीची माहिती मिळताच, भाजपच्या माजी नगरसेविका समिता कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य युद्धपातळीवर होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. तसेच, त्यांनी अगरवाल रुग्णालयात भेट देऊन धुराची बाधा झालेल्या रहिवाशांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.

धुराची बाधा झालेल्या रहिवाशांची नावे -:
– — —- – — – – —- —- — – – —- —- – ——–
(१) सुशीला अढाव (६३ / महिला)

(२) राजेश्री सकपाळ (५८/ महिला)

(३) अश्विनी सकपाळ (५२ / महिला)

(४) सुवर्णा शिंदे (५० महिला)

(५)राजेश्री अढाव (३६ महिला)

(६) मंजुळा जेठवा (४०/ महिला)

(७) अक्षरा सावरकर (३२ / महिला)

(८) विशाखा अढाव (१० मुलगी)

(९) स्वरा अढाव (८ / मुलगी)

(१०) कवीश सारवरकर (४ / मुलगा)