Eco friendly bappa Competition
घर मुंबई मुलुंडनंतर कांजूर व देवनार डंपिंग ग्राउंड लवकरच होणार बंद; खासदार मनोज कोटक...

मुलुंडनंतर कांजूर व देवनार डंपिंग ग्राउंड लवकरच होणार बंद; खासदार मनोज कोटक यांची माहिती

Subscribe

देवनार डंपिंगवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना डंपिंग व कचऱ्याच्या समस्येपासून खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे, अशी ग्वाही ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्याकडून देण्यात आली आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या केंद्र, राज्य सरकार व मुंबई महापालिका यांच्या माध्यातून सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण गेल्या चार वर्षांपासून रस्ते, पूल, कचरा विल्हेवाट, शौचालये आदी विकासकामे करीत आहोत. मुलुंड येथील प्रदूषणकारी डंपिंग बंद करण्यात आले आहे. तळोजा येथे डंपिंगची जागा ताब्यात घेण्यात आली असून लवकरच कांजूर व देवनार डंपिंग ग्राउंडही बंद होणार आहेत. देवनार डंपिंगवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना डंपिंग व कचऱ्याच्या समस्येपासून खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे, अशी ग्वाही ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – सध्या ठाण्याची मालकी कोणाकडे आहे हेच कळत नाही; जितेंद्र आव्हाडांची टीका

- Advertisement -

केंद्रातील भाजपशासित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकिर्दीला नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षात जनतेसाठी राबविलेल्या विविध योजना, विविध विकासकामे आदींची माहिती देण्यासाठी खासदार मनोज कोटक यांनी मंगळवारी विद्याविहार येथे एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये, मनोज कोटक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन व गरीबांचे सरकार म्हणून महिला, बेरोजगार, शेतकरी, विद्यार्थी आदिसाठी राबविलेल्या विविध योजना, रस्ते, पूल आदींची उभारणी, महिलांसाठी रोजगार, उज्वला गॅस योजना, मोफत अन्न धान्य, कोरोना कालावधीत केलेली कामे व लसीकरण आदींबाबतची माहिती ईशान्य मुंबईकरांना दिली. याप्रसंगी, भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईत व विशेषतः ईशान्य मुंबईत अनेक विकासकामे मार्गी लावली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर काही कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. ईशान्य मुंबईचा संपूर्ण कायापालट करून नागरिकांना आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती ईशान्य मुंबईचे भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी दिली.

- Advertisement -

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन रस्ते बांधण्यात येत आहेत. एलबीएस रोड, गोळीबार रोड, अंधेरी -, घाटकोपर लिंक रोड आदी कामे मार्गी लावण्यात येत आहेत. तसेच, विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वे स्थानक येथील पुलांच्या गर्डरची कामे मार्गी लावली जात आहेत. विद्याविहार रेल्वे स्थानक येथे हल्लीच 100 मिटर लांब व एक हजार मेट्रिक टन वजन गर्डरचे काम यशस्वीपणे पार पडले, अशी माहिती खा. कोटक यांनी यावेळी दिली.

अंधेरी – घाटकोपर लिंक रोडवर श्रेयस सिग्नल येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी एका पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे, अशी माहितीही त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली. तसेच, ईशान्य मुंबईतील दिव्यांग लोकांसाठी कृत्रिम अवयव उपलब्ध करण्यात आले आहेत. नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.

त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईतील विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात व अन्य उपनगरीय रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी एस्केलेटर सुविधा व अन्य सेवासुविधा उपलब्ध करून रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे, असे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले.

- Advertisment -