मुंबईसाठी राबणारे हात ! १० तासात ४४२ कोटी लिटर पाण्याचा उपसा

६ पंपिंग स्टेशनमध्ये मोठ्या क्षमतेचे ४३ पंप कार्यान्वित

Mumbai Water logging

मुंबईत रात्री ११ ते पहाटे ४ या कालावधीत तब्बल २०० मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडल्याने मुंबई शहर व उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले. त्याचा रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. मुंबई महापालिकेने पूरस्थिती हाताळण्यासाठी व सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी सहा ठिकाणी मोठया क्षमतेच्या पंपिंग स्टेशनची व्यवस्था केली आहे. या पंपिंग स्टेशनमधील मोठ्या पंपाच्या साहाय्याने १० तासात ४४२ कोटी लिटर पाण्याचा उपसा केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी पूरस्थिती निर्माण होऊन मुंबईची तुंबई झाली होती. त्यामुळे मोठया प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झाली होती. त्यामुळे सदर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅन्ड, हाजीअली, इर्ला, ब्रिटानिया व गझधरबंध या सहा पंपिंग स्टेशनची निर्मिती एकामागून एक केली होती. त्यामुळे आता पावसाळ्यात सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी या पंपिंग स्टेशनचा वापर करण्यात येतो.

सहा पंपिंग स्टेशनमध्ये, मोठ्या क्षमतेचे एकूण ४३ ‘पंप’ कार्यरत आहेत. १७ जुलै ‌रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसादरम्यान मुंबईत पडणारे पावसाचे पाणी खेचून ते समुद्रात टाकण्याचे काम महापालिकेच्या या पंपिंग स्टेशनद्वारे अविरतपणे करण्यात आले. १० तासांच्या कालावधीत ४४२.३५ कोटी लिटर (४४२३.५० दशलक्ष लीटर) इतके पाणी पंपाद्वारे खेचून ते समुद्रामध्ये टाकण्यात आले आहे, ज्यामुळे मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठी मदत झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.

तसेच, या ६ पंपिंग स्टेशनमधील कार्यरत ४३ पंपमधील प्रत्येक पंपाची क्षमता ही प्रत्येक सेकंदाला ६ हजार लिटर पाण्याचा निचरा करण्याची आहे. याचाच अर्थ ६ उदंचन केंद्रांमधील ४३ पंपांची पाणी उपसा करण्याची अधिकतम क्षमता ही प्रत्येक सेकंदाला २ लाख ५८ हजार लिटर एवढी आहे. तथापि, पावसाचे व पंपिंग स्टेशनमधील वाहून येणा-या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप कार्यरत होतात. शनिवार १७ जुलै रोजी रात्री ११ ते रविवार १८ जुलै रोजी सकाळी ९ पर्यंतच्या, म्हणजेच सुमारे १० तासांच्या कालावधीदरम्यान ६ पंपिंग स्टेशनमधील पंपांद्वारे एकूण ४४२.३५ कोटी लिटर (४४२३.५० दशलक्ष लिटर) पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.

या अंतर्गत हाजीअली पंपिंग स्टेशनद्वारे ७४.५६ कोटी लिटर (७४५.५६ दशलक्ष लिटर), लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनद्वारे १०२.९८ कोटी लिटर (१०२९.७८ दशलक्ष लिटर), क्लीव्हलॅंड पंपिंग स्टेशनद्वारे ६८.९४ कोटी लिटर (६८९.४० दशलक्ष लिटर), ब्रिटानिया पंपिंग स्टेशनद्वारे

४१.७९ कोटी लिटर (४१७.९६) दशलक्ष लिटर, इर्ला पंपिंग स्टेशनद्वारे ९५.७३ कोटी लिटर (९५७.२४ दशलक्ष लिटर आणि गज़धरबंध पंपिंग स्टेशनद्वारे ५८.३६ कोटी लिटर (५८३.५६ दशलक्ष लिटर) इतक्या मोठ्या प्रमाणातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.