मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव कारची बसला धडक, चार ठार; महिन्याभरात दुसरा अपघात

mumbai ahmedabad national highway car and luxury bus accident four death

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरीचा आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेसह चार जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील महालक्ष्मीजवळ गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार सरळ बसला जाऊन धडकली आणि हा अपघात झाला आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर महिन्याभरात झालेला हा दुसरा भीषण अपघात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहून एक कार मुंबईच्या दिशेने येत होती. यावेळी अचानक कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर जाऊन आदळली. हा अपघात इतकी भीषण होता, ज्यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. यात कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलाचा समावेश होता. कारमधील चारही प्रवासी हे गुजरातच्या बारडोली मधील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातात लक्झरी बसचंही मोठे नुकसान झालं आहे. तर बसचालक जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अपघाताची आता पोलीस चौकशी सुरु आहे.

महामार्गावर महिन्याभरात दुसरा अपघात

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी 8 जानेवारीला एक भीषण अपघात झाला होता. यात एका चिमुकलीसह तीन प्रवासी जागीच ठार झाले तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. महामार्गावरील कासाजवळ 8 जानेवारीला दुपारी हा अपघात झाला होता.

नालासोपारामधील एक कुटुंब कारने गुजरातच्या भिलाडमध्ये जात असताना ही अपघात झाला होता.राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुमारे एक किलोमीटर पुढे ही भीषण घटना घडली होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखील अपघातांचा महामार्ग बनत असल्याचं समोर येत आहे.


शिंदे सरकारमधील बड्या नेत्याच्या मागणीकडे दुर्लक्ष; 1 फेब्रुवारीला बसणार उपोषणाला