‘कमी दरात सीएनजी द्या’; महानगर गॅस कार्यालयावर रिक्षा चालकांचा मोर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून सीएनजीच्या दरात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. या सीएनजी दरवाढीचा सर्वसमान्यांनंतर आता रिक्षा चालकांनाही फटका बसला आहे. परिणामी रिक्षा चालकांनी मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

गेल्या अनेक दिवसांपासून सीएनजीच्या दरात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. या सीएनजी दरवाढीचा सर्वसमान्यांनंतर आता रिक्षा चालकांनाही फटका बसला आहे. परिणामी रिक्षा चालकांनी मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान रिक्षा चालकांनी सीएनजी इंधन कमी दराने मिळावे यांसह अनेक मागण्या केल्या. त्यामुळे आता रिक्षा चालकांच्या मागणीला महानगर गॅस लिमिटेडकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रिक्षा चालक मालकांना ‘प्रदुषण मुक्त मुंबई’ या उद्देशासाठी त्यांची वाहने सीएनजी इंधनावर चालविण्यास, नवीन खरेदी करण्यास सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावत आहेत. रिक्षा मधून होणारी प्रवासी वाहतूक ही सार्वजनिक सेवा असल्याने मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.

या पत्रात भारतात केंद्र सरकार ठरवून देत असलेल्या दरात सीएनजी देण्याची मागणी करण्यात आली होती. रिक्षा चालकांना कमी दरात सीएनजी मिळाल्याने प्रवाशांवर आर्थिक संकट येणार नाही. दरम्यान त्यांच्या या मागणीला कोणताही प्रतिसाद न आल्याने शशांक राव यांच्या नेतृत्वात मुंबईतील रिक्षा चालक मालकांनी आज मोर्चा काढला.

वाढत्या सीएनजीच्या दरांमुळे रिक्षावर उदरनिर्वाह करत असलेल्या रिक्षाचालक व मालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कमवत असलेल्या पैशांमधून सीएनजीलाच पैसे अधिक जात असल्याने खाण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी पैसे उरत नसल्याचं रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – राजधानी एक्स्प्रेस सुवर्ण महोत्सवी वर्षात; पश्चिम रेल्वेकडून स्पेशल व्हिडीओ शेअर