आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचं बजेट उद्या सादर होणार; मुंबईकरांना बजेटमधून काय हवं?

केंद्रीय अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने पाहणाऱ्या मुंबईकरांची काहीशी निराशा झाल्यानंतर आता त्यांचे डोळे मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्पाकडे लागले आहेत. उद्या मुंबई महापालिकेचा बजेट सादर केला जाणारेय...

केंद्रीय अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने पाहणाऱ्या मुंबईकरांची काहीशी निराशा झाल्यानंतर आता त्यांचे डोळे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत. उद्या मुंबई महापालिकेचा बजेट सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल हे बजेट सादर करतील. मुंबई महापालिकेच्या इतिहासात आयुक्तांनी बजेट सादर करण्याची ही दुसरी वेळ आहे. मुंबईकरांना या बजेटकडून काय अपेक्षा आहेत? जनसामान्यांना या बजेटमधून काय हवंय? जाणून घेऊया…

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणारं शहर म्हणून मुंबईकडे बघितलं जातं. पण कोरोनाच्या संकटामुळे सगळ्याच क्षेत्राला धक्का बसला होता. त्यामुळे महापालिकेच्या यंदाच्या बजेटकडं मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून महामारीने सगळ्यांनाच मुळापासून हलवून टाकलं. देशाच्या अर्थसंकल्पानंतर सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे ते मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे. उद्या सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून नवा कर न लादला जाण्याची अपेक्षा मुंबईकरांना आहे. परंतु खरंच ते शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मायानगरी मुंबईची लोकसंख्या दोन कोटींच्या घरात आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला रस्ते, पाणी, स्वच्छता , मलनिस्सारण अशा मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी या महापालिकेवर आहे. मागील वर्षी ४५,९४९ कोटींचं बजेट सादर करण्यात आलं होतं. रस्ते, वीज, पाणी, उड्डाणपूल, वाहतूक नियंत्रण, घनकचऱ्याचे निवारण, मलनिस्सारण व्यवस्था मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन, प्राचीन इमारतींचे जतन, वाहनतळाचे आरक्षण आणि नैसर्गिक साठ्यांचे (तलाव, नाले) जतन करणे अशा अनेक अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केल्या आहेत.

मुंबईत २०२० पासून सुरू झालेले कोरोनाचे संकट जवळपास नियंत्रणात आले आहे. परंतु या काळात कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा फिकी पडत असल्याने मृत्यूची संख्याही वाढू लागली होती. अशा परिस्थितीचा सामना पुन्हा करू लागू नये म्हणून मुंबई शहरातील आरोग्य यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी पावले उचलली जावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येतेय.

तसंच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही तरतुदी, अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीच्या मागणी, महापालिका शाळांचा विकास, सरकारी शाळांचा दर्जा खासगी शाळा आणि पब्लिक स्कूलच्या बरोबरीचा असावा आणि शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या अधिकाधिक विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण कमी खर्चात प्राप्त व्हावे याचा विचार होणे गरजेचे आहे, असं देखील काही मुंबईकरांनी सांगितलं आहे.

राजधानी मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत आहे. मुंबईतील वाहतुकीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिकेने विचार करायला हवा. सगळे रस्ते, उड्डाणपूल यांच्यावरील एकत्रित वाहतूक नियंत्रण आणि नियोजनासाठी योग्य प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. मुंबईत सध्या सुमारे ३५ लाख वाहने असून, प्रति हजार व्यक्ती २६१ जणांकडे स्वतःचे खासगी वाहन आहे. सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. यातील सुमारे ९५ टक्के रस्त्यांना देखभालीची आवश्यकता भासते. याचा विचारही बजेटमध्ये व्हावा, असं मुंबईकरांना वाटतं.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक भरडून निघाला आहे. कोरोना काळात नागरिकांना अव्वाच्यासव्वा वीजबिलं आली आहेत. आजपर्यंत मुंबईकर ही बिघडलेली आर्थिक गणित रुळावर आणण्याच्या प्रयत्न करतोय. त्यात भविष्यात येऊ घातलेली आर्थिक मंदी आहे. आधीच मुंबईकर पिचला गेला असून महापालिकेकडून नवीन करवाढ करू नये, अशी भावना मुंबईकरांची आहे.