घरमुंबईमुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ?

मुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ?

Subscribe

वॉर्ड पुनर्रचना आराखड्यावरील हरकतींचे विवरणपत्र देण्यास २ मार्चची मुदत

मुंबई महापालिकेच्या २०२२ मधील प्रस्तावित निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनातर्फे पाठवण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. तसेच मुंबई महापालिकेचा प्रारूप आराखडा ओबीसी आरक्षण वगळून सूचना हरकतीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रभाग रचनेबाबत १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हरकती सूचना मागवल्या जाणार आहेत. तर २ मार्च रोजी शिफारशीसह विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे. त्यानंतर कमीत कमी ४५ दिवस निवडणूक तयारीला लागतील. त्यामुळे पालिका निवडणुका एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी राज्य मंत्रिमंडळाने २३६ प्रभाग बनवण्याचा निर्णय घेतला होता. मागील आठ दिवसांपूर्वीच २३६ प्रभागांच्या सीमा निश्चित करून त्याचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर २८ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना प्रभागांबद्दलचा कार्यक्रम जाहीर करण्याची शिफारस केली होती. या अंतर्गत २३६ विभागांच्या सीमांबाबत हरकती सूचना मागवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम निश्चित करून दिला आहे.

- Advertisement -

त्यानुसार याबाबतची अधिसूचना १ फेब्रुवारीला जारी केली जाणार आहे.१ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तक्रारी आणि सूचना मागवल्या जाणार असून १६ फेब्रुवारीला तक्रार सूचनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. तसेच १६ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. त्यानंतर २ मार्च रोजी शिफारशीसह विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -