‘त्या’ कर्मचाऱ्यांची आता प्रमोशनसाठीच्या परीक्षेतून सुटका

bmc

मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या मात्र पन्नाशी गाठलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दसरा, दिवाळीपूर्वीच मोठ्या लॉटरी लागली आहे. सदर कर्मचाऱ्यांना आता प्रमोशनसाठी वेगळी ‘परीक्षा’ द्यावी लागणार नाही. राज्य सरकारच्या धर्तीवर पालिका सेवेत वयाची ५० वर्ष पूर्ण केलेल्या लिपिक व कनिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यकांना यापुढे पदोन्नतीसाठी परिक्षेची अट राहाणार नाही. त्यांना मुख्य लिपिक व वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यकाची वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व विविध कामगार संघटनांचे कामगार नेते यांच्यात मंगळवारी एक महत्वाची बैठक यशस्वीपणे पार पडली. त्यामध्ये वरीलप्रमाणे सकारत्मक निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती कामगार नेते बाबा कदम, ऍड. प्रकाश देवदास व ऍड. दुखदेव काशीद यांनी दिली.

मुंबई महापालिकेत मुख्य लिपिक व वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यक पदाचे प्रमोशन मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या आवश्यक परीक्षेत ५० टक्के गुण मिळविणे बंधनकारक आहे. तसेच, उर्वरित २५ टक्के पदांना सेवाज्येष्ठतेने पदोन्नती दिली जाते. मात्र राज्य सरकारने १ ऑगस्ट २००१ पासून लागू केलेल्या सेवांतर्गत पदोन्नती योजनेत शासनात वयाची ५० वर्षे पूर्ण केल्यानंतर पदोन्नतीसाठी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या कर्मचारी हितावह निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महापालिकेतही करण्याची मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून पालिका प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती.मात्र त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेऊन सकारत्मक निर्णय अद्यापर्यंत घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे कर्मचारी संघटना व कामगार नेते हे नाराज होते. मात्र पालिका आयुक्त पदाची सूत्रे गेल्यावर्षी हाती घेतलेले पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, याप्रकरणी स्वतः लक्ष घातले व वरीलप्रमाणे सकारात्मक निर्णय घेतल्याने कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

लिपिक परीक्षा दोन महिने पुढे ढकलली

आगामी लिपिक परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत पालिका अधिकारी आणि संघटना प्रतिनिधी यांची समिती निर्णय घेईल, अशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली.


हेही वाचा – मेट्रो रेल्वेसाठी ५०४, इमारत,पूलांसाठी ४८० झाडांची कत्तल करण्यास मंजुरी