घरमुंबईपरळचा नवा प्लॅटफॉर्म १० जून पासून प्रवाशांसाठी खुला

परळचा नवा प्लॅटफॉर्म १० जून पासून प्रवाशांसाठी खुला

Subscribe

एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने नव्या प्लॅटफॉर्मचं काम जोमाने हाती घेतलं होतं. या प्लॅटफॉर्मचं काम आता अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. येत्या रविवारपासून अर्थात १० जून पासून परळचा नवा प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे कायमच गर्दी असणाऱ्या या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
रविवारपासून प्लॅटफॉर्म मुंबईकरांच्या सेवेत
परळ स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूलाच हा नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. यावरून सुरूवातीला मध्य रेल्वेच्या अप स्लो गाड्या धावणार आहेत. प्लॅटफॉर्मचं काम झाल्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डॉ. डी. के. शर्मा आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी मंगळवारी या प्लॅटफॉर्मची पहाणी केली. त्यानंतर रविवारपासून प्लॅटफॉर्म सेवेसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१० जूनला रविवार असून मध्य रेल्वेवर विशिष्ट कालावधीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबू लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कसा असेल नवा प्लॅटफॉर्म
या नव्या प्लॅटफॉर्मची लांबी १५ डब्यांची असून सध्या १२ मीटर रुंदीच्या नव्या पदचारी पुलाला पूर्व ते पश्चिम जोडण्यात आले आहे. पण ज्यांना पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्टेशनकडे जायचं असेल, त्यांच्यासाठी मार्ग नसल्याने जुन्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून असलेल्या पुलाचाच वापर करावा लागणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
हा नवा प्लॅटफॉर्म एकूण तीन ठिकाणी जोडला जाणार आहे. त्यासाठी भक्कम स्वरूपाचे जोडमार्ग तयार केले जाणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर १ आणि २ वरून रेल्वे सेवा सुरू आहे. एकाच वेळी दोन्ही बाजूंनी रेल्वे गाड्या आल्या की ब्रिजवर प्रंचड गर्दी होते. त्याच कारणाने चेंगराचेंगरीसारखी दुर्दैवी घटना एल्फिन्स्टन स्टेशनवर घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -