घरताज्या घडामोडीदेशातील पहिल्या 'कोस्टल रोड'चे काम युद्ध पातळीवर सुरू; अडीच वर्षात कोस्टल रोडचे...

देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’चे काम युद्ध पातळीवर सुरू; अडीच वर्षात कोस्टल रोडचे ३६% काम पूर्ण

Subscribe

मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या १०.५८ किमी लांबीच्या आणि तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च असलेल्या देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’चे काम कोरोना कालावधीत युद्धपातळीवर सुरू आहे. १६ डिसेंबर २०१८ रोजी शिवसेना पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ‘कोस्टल रोड’ चे भूमिपूजन करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे १० जुलै २०२१ पर्यंत या ‘कोस्टल रोड’चे ३६% इतके काम पूर्ण झाले आहे. या कोस्टल रोडचे ५०% काम २०२१ अखेरपर्यंत तर २०२२ पर्यंत ८५% आणि जुलै २०२३ पर्यंत १००% पर्यंत काम पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. या कामासाठी आतापर्यंत १३०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करण्यात आलेला आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासातील हा सर्वात जास्त मोठा आणि महत्वकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.

मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविणे, जलद प्रवास करणे आणि इंधन वाचवणे आदी बहुउद्देशाने मुंबई महापालिकेने ‘कोस्टल रोड’ उभारण्याचा निर्णय घेतला. कोरोना महामारीमुळे या ‘कोस्टल रोड’चे काम कोरोना काहीसे रखडले होते. मात्र आता कोरोनाची तमा न बाळगता युद्धपातळीवर काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. इंधनात ३०% बचत होणार आहे. मुंबईकरांना वाहनांच्या पार्किंगसाठी जागा मिळणार असून हरित पट्टेही उपलब्ध होणार आहेत. तसेच, प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक पर्यंतचा प्रवास अवघ्या १० मिनिटात सुसाट होणार आहे. २०२१ पर्यंत ५०% – ५५% तर २०२२ पर्यंत ८५% आणि जुलै २०२३ पर्यंत १००% पर्यंत काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प तीन पॅकेजमध्ये विभागला आहे. पॅकेज -१ प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंत (३.८२ किमी), पॅकेज -२ बडोदा पॅलेस ते वांद्रे – वरळी सी लिंकपर्यंत (२.७१ किमी) आणि पॅकेज -४ प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत (४.०५ किमी) असून पॅकेज -३ हे वांद्रे ते दहिसरपर्यंत असणार आहे. ते काम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंबईतील या महत्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ चे काम पालिका आयुक्त इकबाल चहल आणि अति.आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. या ‘ कोस्टल रोड’ च्या कामाअंतर्गत समुद्रात भरावाचे काम १०० हेक्टर म्हणजे ९० % झालेले आहे . तसेच समुद्र भिंतीचे काम ६८ % इतके पूर्ण झाले आहे.

बोगदा खोदण्याचे काम ५०० मिटर म्हणजे ११% पूर्ण

कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत दोन बोगदे खोदण्यात येत असून त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत प्रत्येकी २.०७ किमी लांबीचे दोन बोगदे ‘मावळा’ संयंत्राद्वारे ( टनेल बोअरिंग मशीन) खोदण्यात येत आहेत. एक बोगदा उत्तर मुंबईकडे जाणारा तर दुसरा बोगदा दक्षिण मुंबईकडे येणारा असणारा आहे. या बोगद्याला अमरसन्स, हाजीअली आणि वरळी या तीन ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. ११ ठिकाणी दोन्ही टनेल एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आप्तकाळात एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यात जाता येणार आहे. हे बोगदे काही ठिकाणी १० मीटर तर काही ठिकाणी ७५ मीटर इतके जमिनीत खोलवर असणार आहेत.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १२ जानेवारी २०२१ रोजी बोगदे खोदण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत म्हणजे १० जुलै २०२१ पर्यंत सहा महिन्यात बोगदा खोदण्याचे काम ५०० मिटर म्हणजे ११% पूर्ण झाले आहे. सदर बोगदा हा प्रियदर्शनी पार्क येथून समुद्राखालून जाऊन , मलाबार हिल या टेकडीखाली सध्या खणला जात आहे . या व्यतिरिक्त, पाईल्स, पुलांचे स्तंभ, पुलासाठी लागणारे गर्डर, बोगद्यामधील प्रवेशासाठी असणारे उतार, आर.सी.सी. बॉक्स इत्यादी कामे मोठया प्रमाणावर सुरू आहे . त्यामुळे सदर प्रकल्प विहीत वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – खासदार राहुल शेवाळेंच्या पुढाकाराने धारावीमध्ये मोफत मेगा लसीकरण मोहीम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -