मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबई महापालिका आणि प्रशासनाला काहीसे यश मिळताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाली. शुक्रवारी मुंबईत ६९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, शनिवारी मुंबईत ६४८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १९ हजार ६१० इतकी झाली आहे. तसेच मृतांच्या संख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर शनिवारी हा आकडा १५ इतका झाला. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १५ हजार ३८३ इतकी झाली आहे.
#CoronavirusUpdates
२६ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ६४८
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १९१९
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९२७८७
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ९१४८
दुप्पटीचा दर- ७२३ दिवस
कोविड वाढीचा दर ( १९ जून ते २५ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 26, 2021
१९१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले
तसेच आणखी एक समाधानकारक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या जास्त होती. शनिवारी ६४८ कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना १९१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ९२ हजार ७८७ इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्के इतके झाले आहे.
रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्के
मुंबईत मागील २४ तासांत ३३ हजार ७५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ६४८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत सध्या ९ हजार १४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच मुंबईत १९ जून ते २५ जून या कालावधीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.०९ टक्के इतका होता. तर रुग्ण दुप्पटीचा दर ७२३ दिवस इतका झाला आहे.