घरCORONA UPDATECorona Update : मुंबईची रेकॉर्डब्रेक कामगिरी! दिवसभरात कोरोनाचे फक्त ३ मृत्यू!

Corona Update : मुंबईची रेकॉर्डब्रेक कामगिरी! दिवसभरात कोरोनाचे फक्त ३ मृत्यू!

Subscribe

गेल्या ९ महिन्यांपासून मुंबईसह देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात आत्तापर्यंत एक कोटीहून जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर तब्बल दीड लाख कोविड-१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जशी महाराष्ट्रात कोरोनाची अशीच परिस्थिती दिसत आहे, तशीच मुंबईतही काहीशी हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. रविवारी मात्र मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक माहिती मुंबई महानगर पालिकेने जाहीर केली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रविवारी दिवसभरात फक्त ३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून अर्थात मुंबईसह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून आजपर्यंतची ही मुंबईतली एका दिवसातली सर्वात कमी मृत्यूसंख्या असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईची रेकॉर्डब्रेक कामगिरी!

रविवारी दिवसभरात मुंबईत एकूण ५८१ नवे कोरोनाबाधित सापडले असून एकूण बाधितांची संख्या २ लाख ९५ हजार २४० इतकी झाली आहे. तर २४ तासात तब्बल ६९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतल्या कोरोना मृतांचा आकडा ११ हजार १३५ जरी झाला असला, तरी गेल्या ९ महिन्यात पहिल्यांदाच दिवसभरात अवघ्या ३ मृतांची नोंद करून मुंबईने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ३१ मार्च रोजी मुंबईत सर्वात कमी ७ मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर थेट २ डिसेंबरला मुंबईत ९ मृत्यू झाले होते. त्यानंतर २ जानेवारी रोजी देखील मुंबईत ७ मृत्यूंची नोंद करण्यात आली. मात्र रविवारी फक्त ३ मृत्यू झाल्यामुळे हा आकडा आता शून्याकडे वाटचाल करू लागला आहे.

- Advertisement -

पालिका आयुक्तांनी कंबर कसली!

ऐन कोरोनाच्या संकटामध्ये प्रविणसिंह परदेशी यांच्याकडून इकबालसिंह चहल यांच्याकडे पालिका आयुक्तपदाची धुरा आली. कार्यभार स्वीकारताच चहल यांनी स्वत: मैदानात उतरून मुंबईभर दौरे काढले आणि परिस्थिती समजून त्यानुसार उपाययोजना करायला सुरुवात केली. मग ती परदेशातून मोठ्या संख्येने मुंबईत उतरणाऱ्या लोकांची हॉटेल आणि विविध सेंटर्समध्ये क्वारंटाईनची व्यवस्था लावणं असो किंवा त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करणं असो. याच काळात वरळी आणि धारावीसारख्या परिसरांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागल्यामुळे त्या आव्हानाचा सामना देखील प्रशासनाला करावा लागला. आजपर्यंत मुंबई महानगर पालिकेने कोरोनावरील उपाययोजनांसाठी तब्बल १४०० कोटींचा खर्च केला आहे. आता याच उपाययोजनांच्या जोरावर मुंबईतील मृतांचा आकडा अर्थात कोरोना मृत्यूदर शून्यावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

मुंबईत दिवसभरात फक्त ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्य सरकार आणि पालिकेच्या प्रयत्नांचच हे यश आहे. मी मुंबईकरांनी दिलेल्या सहकार्यासाठी आणि पाठिंब्यासाठी त्यांचे धन्यवाद देतो. त्यासोबतच डॉक्टर आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे, माध्यमांचे, कोरोना योद्ध्यांना मी सलाम करतो. त्यांनी सकारात्मक जागृती घडवून आणल्यामुळेच हे शक्य झालं.

इक्बालसिंह चहल, मुंबई पालिका आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -