मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित

Parambir Singh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह तिघांना गोरेगाव येथील हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यात किल्ला कोर्टाकडून फरार घोषित करण्यात आले आहे. गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह उर्फ बबलू यांना फरार घोषित करण्यासाठी गेल्या आठवड्यात कोर्टात गुन्हे शाखेकडून अर्ज करण्यात आला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान, बुधवारी कोर्टाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे (किल्ला कोर्ट)न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला. पोलीस आयुक्त पद भूषवलेल्या एका अधिकार्‍याला कोर्टाने फरार घोषित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

गोरेगाव येथील हॉटेल बोहो अ‍ॅण्ड रेस्टॉरंट हे विनादिक्कत सुरू रहावे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करू नये, म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची खंडणी उखळली, अशी तक्रार हॉटेल मालक बिमल अग्रवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, खासगी इसम अल्पेश पटेल, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू, सुमित सिंह उर्फ चिंटू यांच्याविरुद्ध खंडणी, धमकी देणे, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने अल्पेश पटेल आणि सुमित सिंह या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, गुन्हे शाखेने परमबीर सिंह, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू यांना नोटीस पाठवून देखील त्यांनी नोटिसीला उत्तर दिलेले नाही. तसेच ते चौकशीसाठी सामोरे आलेले नव्हते. मुंबई गुन्हे शाखेने पंधरा दिवसांपूर्वी सचिन वाझे याला या प्रकरणात तळोजा तुरुंगातून ताब्यात घेऊन अटक केली होती. गुन्हे शाखेने परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांच्या पत्नी व कर्मचारी यांचे जबाब नोंदवून घेतले होते.

परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह हे त्यांना नोटीस मिळूनही ते चौकशीला येत नसल्यामुळे या तिघांना कोर्टाने फरार घोषित करावे यासाठी गुन्हे शाखेने किल्ला कोर्टात शनिवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवारी किल्ला कोर्टात सुनावणी झाली. न्यायाधीश भाजीपाले यांनी परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह या तिघांना फरार घोषित केले आहे. या तिघांना फरार घोषित केल्यानंतर तिघांच्या नावावर असलेल्या संपत्तीवर देखील टाच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रियाज भाटी हा या प्रकरणानंतर गायब झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, त्याचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली असून मुंबई गुन्हे शाखेच्या इतर कक्ष आणि खंडणी विरोधी पथकांना भाटीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.