मुंबई : अरबी समुद्राच्या मार्गे भारतात हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या आठ पाकिस्तानी नागरिकांना विशेष एनडीपीएस न्यायालयाने दोषी ठरवले. आणि 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरण 2015 मधील आहे. (mumbai court sentences eight pakistani nationals to 20 years imprisonment in 2015 drugs seizure case)
कराचीतून भारतीय सागरी हद्दीत आलेल्या ‘अल यासिर’ जहाजाशी हे प्रकरण संबंधित आहे. 232 किग्रॅ. हेरॉईनसह भारतीय तटरक्षक दलाने हे जहाज पकडले होते. या हेरॉईनची किंमत 6.93 कोटी असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली होती.
या आरोपींमध्ये अलीबख्शा सिंधी, मकसूद मासिम, मोहम्मद नाथो, मोहम्मद अहमद इनायत, मोहम्मद युसूफ गगवानी, मोहम्मद युनूस सिंधी, मोहम्मद गुलहसन सिंधी आणि गुलहसन सिद्दीक सिंधी यांचा समावेश आहे. हे सगळे आरोपी 2015 पासून मुंबईच्या तुरुंगात आहेत.
18 ऑगस्ट 2022 रोजी या प्रकरणाशी संबंधित 11 मोठे निळे प्लास्टिक ड्रम येलो गेट पोलीस स्टेशन येथून मुंबई सत्र न्यायालयात आणण्यात आले. 2015 मध्ये याच ड्रममधून 232 किलो हेरॉईनची तस्करी करण्यात आली होती.
तटरक्षक दलाची कारवाई
भारतीय तटरक्षक दलाच्या ‘संग्राम’ या जहाजाचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसरनी विशेष एनडीपीएस न्यायालयात उपस्थित राहून संपूर्ण घटना सांगितली. अल यासिर जहाज कशापद्धतीने पकडण्यात आले आणि जहाजावरील आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानी जहाज अल यासिरवरून पकडण्यात आलेले कर्मचारीच न्यायालयात आरोपी म्हणून हजर असल्याचे त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा – Free Wi-Fi : एअर इंडियाचे प्रवाशांना नवीन वर्षाचे गिफ्ट; आता फ्लाईटमध्ये मिळणार फ्री वायफाय
विशेष एनडीपीएस न्यायालयाने या सर्व आरोपींना एनडीपीएस कायद्या अंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे भारतात ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचा हा परिणाम आहे.