मुंबई – बदलापूरच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत एका चिमुकलीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली. सोमवारी रात्री ड्रग्जच्या नशेत असलेल्या नराधमाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केली. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईतील अत्याचाराच्या या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. माहिम मतदारसंघातून पराभूत झालेले मनसे उमेदवार अमित ठाकरे यांनी या घटनेसंबंधी समाज माध्यमावर पोस्ट करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमित ठाकरेंनी सोशल मीडियावरील पोस्ट द्वारे इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘हे’ फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे!’
‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. pic.twitter.com/ERKKeOPETB
— Amit Thackeray (@amitrthackeray) November 26, 2024
सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत सोमवारी रात्री तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या अनिल गुप्ता नावाच्या नराधमाने अमानुष अत्याचार केले. या घटनेनंतर गंभीर अवस्थेत चिमुकलीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज ती रुग्णालयात जीवनमरणाची झुंज देत आहे. अशीच घटना बदलापूर येथे एका प्रतिष्ठित शाळेत घडली होती. त्या घटनेवर संपर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त झाला होता.
सायन कोळीवाड्यातील घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. अमित ठाकरेंनी मुंबईतील ड्रग्जच्या गोरखधंद्यावरच बोट ठेवले आहे. त्यांनी समाज माध्यमावर यासंबंधी सरकारा इशारा दिला आहे. तसेच मुंबईत सुरु असलेले ड्रग्जचे नेटवर्क मोडून काढण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणाल अमित ठाकरे…
आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे.
मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याचे सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता आवश्यक झालं आहे.
मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे.
आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे.
जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही!
हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची!
आपला,
अमित ठाकरे