अरूण सावरटकर
मुंबई : वांद्रे येथे आईने स्वतःच्याच 10 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच अभिलाषा औटे या 36 वर्षांच्या आरोपी महिलेस खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अभिलाषा हिला स्क्रिझोफेनिया हा आजार असून या आजारातून ती अनेकदा आक्रमक होत असल्याने तिने तिच्या मुलाची हत्या केल्याची चर्चा आहे. (mumbai crime schizophrenia patient mother strangle her son with wire till death at bandra kherwadi)
रवींद्र औटे हे गृहविभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते त्यांची पत्नी अभिलाषा आणि 10 वर्षांचा मुलगा सर्वेश यांच्यासोबत वांद्रे येथील वाय कॉलनीतील मजल्यावरील रुम क्रमांक 80 मध्ये राहत होते. त्यांची पत्नी अभिलाषा ही आजारी असून तिला स्क्रिझोफेनिया नावाचा एक आजार आहे. या आजारामुळे ती अनेकदा प्रचंड आक्रमक, तर कधी अतिप्रेमळ वागते.
गुरुवारी सायंकाळी ती तिच्या 10 वर्षांच्या मुलासोबत घरी होती. रात्री पावणेआठ वाजता तिने दरवाजा बंद करून सर्वेशची वायरने गळा आवळून हत्या केली. हा प्रकार नंतर रवींद्र औटे यांच्या लक्षात येताच त्यांनी खेरवाडी पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी सर्वेशला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर रवींद्र यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्यांची पत्नी अभिलाषाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. स्क्रिझोफेनिया आजारामुळे तिच्या हातातून सदरचा गुन्हा झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तिची पोलिसांकडून वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. डॉक्टरांचा अभिप्राय आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गुरुवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar