Homeक्राइमMumbai Crime : अंमली पदार्थ विक्रीस आलेल्या दोघांना अटक, 1.15 कोटींचा हेरॉईनचा...

Mumbai Crime : अंमली पदार्थ विक्रीस आलेल्या दोघांना अटक, 1.15 कोटींचा हेरॉईनचा साठा जप्त

Subscribe

गोरेगाव परिसरात हेरॉईनची म्हणजेच अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या उत्तराखंडच्या दोन पेडलर्सना घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

मुंबई : गोरेगाव परिसरात हेरॉईनची म्हणजेच अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या उत्तराखंडच्या दोन पेडलर्सना घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या दोघांकडून पोलिसांनी 288 ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 15 लाख रुपये इतकी किंमत आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनीजवळ पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Crime Two drug dealers arrested, 1.15 crore worth of heroin seized)

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील आरे मिल्क कॉलनीजवळ काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून गुरुवारी (ता. 19 डिसेंबर) सायंकाळी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 01 कोटी 15 लाख रुपयांचे 288 ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. चौकशीत दोन्ही आरोपी उत्तराखंडचे रहिवाशी असून ते ड्रग्ज पेडलर्स म्हणून काम करतात. हेरॉईन ड्रग्ज विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीने मुंबई शहरात यापूर्वीही ड्रग्जची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा… Mumbai News : मुंबईतील डेब्रिजच्या विल्हेवाटसाठी पालिकेकडून दोन हजार कोटीचा खर्च

या प्रकरणी या दोघांविरोधात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरा या गुन्ह्यांत अटकेची कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. 20 डिसेंबर) दुपारी दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. चालू वर्षात अंमली पदार्थ विरोधी पथकाने हेरॉईनसंबंधित सात गुन्ह्यांची नोंद केली केली असून या गुन्ह्यांत 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून 11 कोटी 25 लाख रुपयांचे 02 किलो 895 ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे.


Edited By Poonam Khadtale