घरमुंबईडबेवाल्यांचा आहेर निघाला लंडनला!

डबेवाल्यांचा आहेर निघाला लंडनला!

Subscribe

मुंबईचा डबेवाला आणि ब्रिटनच्या राजघराणे.. यांचे नाते जगप्रसिद्ध आहे. हे नात्यातील ऋणानुबंध पुन्हा एकदा दिसून आले. ब्रिटनचा प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूडची अभिनेत्री मेगन यांचा १९ मे रोजी शुभविवाह होणार आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या डबेवाल्यांनी या लग्नासाठी खास आहेर पाठविण्याची व्यवस्था केली आहे. मुंबईतल्या लालबागमधील समर्थ कलेक्शनमध्ये डबेवाल्यांनी गुरुवारी आहेराची जोरदार खरेदी केली.

ब्रिटनच्या राजघराण्यातील हा शाही विवाह युनायटेड किंग्डम येथील विंड्सर या शहरात होणार असून सध्या जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्सला आहेर देण्यासाठी मोठ्या उत्साहात खरेदी केली आहे. प्रिन्स आणि मेगनला डबेवाल्यांकडून आहेर म्हणून मराठमोळा पोशाख पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्राची शान असलेली पैठणी, भगवा फेटा आणि झब्बा-कुर्ता यांचा त्यात समावेश आहे.

- Advertisement -

मुंबईतील डबेवाल्यांच्या परंपरेला १२८ वर्षे झाली आहेत. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेतली होती. त्यानंतर डबेवाल्यांची महती जगभर पोहोचली होती. त्यावेळी चार्ल्स यांनी डबेवाल्यांचे कौतुक करत त्यांना ‘मॅनेजमेंट गुरु’ अशी उपमा दिली होती. तेव्हापासून आजतागायत मुंबईतील डबेवाल्यांचे ब्रिटनसोबत इतर देशांमधील पर्यटकांमध्ये आकर्षण वाढत आहे. चार्ल्सचा मोठा मुलगा आणि ब्रिटनचा भावी राजा विल्यम याच्या विवाहाला मुंबईच्या डबेवाल्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. या विवाहाला मुंबईच्या डबेवाल्यांनी मोठ्या आनंदाने आकर्षक आहेर घेऊन उपस्थिती लावली होती.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांच्यासह अनेक डबेवाल्यांनी हॅरी आणि मेगन यांच्या विवाहासाठी गुरुवारी आहेराची खरेदी केली. मराठी संस्कृती जपण्याकरता आहेरासाठी मराठमोळ्या पोशाखाची खरेदी करण्यात आली, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -