घरमुंबईमुंबईच्या डबेवाल्यांनी दिल्या प्रिन्स हॅरी-मेगनला लग्नाच्या शुभेच्छा!

मुंबईच्या डबेवाल्यांनी दिल्या प्रिन्स हॅरी-मेगनला लग्नाच्या शुभेच्छा!

Subscribe

लंडनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा विवाह सोहळा १९ मे रोजी संपन्न होणार आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनीही शुभेच्छा दिल्या. लंडनचे राजघराणे आणि डबेवाले यांचे भावनिक नाते आहे. या नात्याचा मान ठेऊन प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नात डबेवाल्यांना आमंत्रित करण्यात आले होते. डबेवालेही त्या शाही सोहळ्याला उपस्थित राहिले होते. डबेवाल्यांची चांगली बडदास्त त्यावेळी लंडनच्या राजघराण्याने ठेवली होती. यंदाही प्रिन्स हॅरीच्या लग्नाचे आमंत्रण आले तर नक्की जाऊ, असे डबेवाल्यांनी म्हटले आहे.

प्रिन्स हॅरीच्या लग्नाचा आम्हा डबेवाल्यांना आनंद आहे. त्यांच्या लग्नाचा दिवस आम्ही साजरा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया डबेवाल्यांचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली. राजघराण्यातून या लग्नासाठी आमंत्रण आल्यास अध्यक्ष उल्हास मुके आणि शांताराम करवंदे लग्नाला जातील, असे तळेकर म्हणाले.

- Advertisement -

प्रिन्स हॅरीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आल्याने लंडनच्या राजघराण्यात शाही लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. परंपरेनुसार नवविवाहित जोडप्याची वरात चार घोड्यांच्या रथातून काढली जाईल. हा रथ विंडसर पॅलेस ते शहराच्या केंद्र स्थानापर्यंत जाईल. विविध क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रिटी या शाही सोहळ्याला हजेरी लावणार असल्याने अनेकांचे लक्ष या लग्नाकडे लागले आहे. या सोहळ्यात कशा प्रकारे कपडे परिधान करून यायचे याचे काही नियम आहेत आणि शाही घराण्यातील सदस्यांना हे नियम पाळावेच लागतात. १९ तारखेला पार पडणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी पुरुषांनी मॉर्निंग सूट किंवा लाँग सूट आणि महिलांनी डे ड्रेस आणि हॅट परिधान करणं अपरिहार्य असणार आहे. हा ड्रेसकोड प्रत्येकासाठी सारखाच असणार आहे. याव्यतिरिक्तही कपड्यांबाबत काही नियम आहेत. ते लग्न सोहळ्याला येणाऱ्या राजघराण्यातील प्रत्येक सदस्याला पाळावेच लागतील.

लग्नसोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला हॅट परिधान करणं अनिवार्य आहे. ही हॅट मोठीही नसावी याची काळजी प्रत्येक महिलेने घायची असते. मोठ्या हॅटमुळे तिच्या मागे बसणाऱ्या पाहुण्यांना समोरचे दृश्य दिसणार नाही. म्हणूनच हॅट योग्य निवडणे गरजेचे असते.

- Advertisement -

हॅटऐवजी अनेक महिला फॅसिनेटरला पसंती देतात. हॅटसारखेच पण किंबहुना हॅटपेक्षा हे छोटे हेडगिअर असतात. हे फॅसिनेटरदेखील चार ते पाच इंच असावे असाही नियम असल्याचं एका इंग्रजी वेबसाईटने म्हटलं आहे. महिलांनी खांदे झाकलेले असावेत असाही नियम येथे आहे. तसेच शाही लग्नासाठी डे ड्रेस निवडताना अनेक महिला या पांढरा रंग टाळतात कारण हा रंग नववधूसाठी राखून ठेवण्यात येतो. शाही विवाह सोहळ्याला येणाऱ्या महिलांनी अत्यंत तोकडा डे ड्रेस घालू नये असाही नियम आहे त्यामुळे महिलांनी गुडघ्यापर्यंत येणारा ड्रेस परिधान करूनच येणं बंधनकारक आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -