Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

नायर रूग्णालयात 7 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले ; मात्र त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 3 जखमींपैकी 1 जण मृत पावला.

mumbai fire break out kamala residential building tardeo
Mumbai Fire: मुंबईतील ताडदेव भागात इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

ताडदेव,नाना चौक, ग्वालिया टँक येथील कमला या तळमजला अधिक 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर शनिवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे 6 जणांचा होरपळून व आगीचा धूर नाकातोंडात गेल्याने गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जण गंभीर आहेत. त्यांच्यावर नायर, कस्तुरबा, भाटिया व मसीना या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तसेच, वॉकहार्ट व एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचार घेऊन बरे वाटल्याने प्रत्येकी एक याप्रमाणे दोघांना तर भाटिया रुग्णालयातील 5 जणांना उपचार घेऊन बरे वाटल्याने डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नाना चौक, ग्वालिया टँक येथे कमला ही तळमजला अधिक २० मजली रहिवाशी इमारत आहे. सकाळी रहिवाशी झोपेत असताना या इमारतीच्या 18 व्या मजल्यावर अचानक आग लागली. या काही अवधीतच ही आग भडकली. एका घरातील एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात अडचण आली. परिणामी आग आणखीन भडकली.

या आगीची माहिती समजताच इमारतींमध्ये एकच खळबळ उडाली. काही रहिवाशांनी भितीमुळे आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. तर काही स्थानिक नागरिक, शिवसैनिक आदींनी इमारतीमध्ये अडकलेल्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले होते. दरम्यान, एका तासातच आग आणखीन भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने सकाळी 7.42 वाजता आग स्तर -3 ची म्हणजे भीषण स्वरूपाची असल्याचे जाहीर केले.

अग्निशमन दलाने आगीची भीषणता पाहता आग विझविण्यासाठी आणखी कुमक मागवली. तब्बल 13 फायर इंजिन, 7 जंबो वॉटर टँकर, 1 बीए व्हॅन, 1 रुग्णवाहिका अशी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून सकाळी 10.05 वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. सकाळी 12.00 वाजता आग पूर्णपणे विझविण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशनचे काम हाती घेतले. दरम्यान, आगीने भीषण रूप धारण करण्यापूर्वीच अनेक रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र काही जण इमारतीमध्ये अडकले होते. 29 जणांना जीवघेण्या आगीतून बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

नायर रूग्णालयात 7 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले ; मात्र त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 3 जखमींपैकी 1 जण मृत पावला. तसेच, भाटिया रुग्णालयात दाखल 17 जणांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून 5 जणांना यशस्वी उपचाराने बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे तर 12 जण उपचार घेत आहेत. तडे, मसीना रुग्णालयात एकजण उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ही आग का व कशी काय लागली, इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा वेळीच कार्यान्वित का झाली नाही, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे.

मृतांची माहिती

२९ पैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एका महिलेचा मृतदेह कस्तुरबा रुग्णालयात आहे. तर नायर रुग्णालयात ५ मृत व्यक्ती असून त्यापैकी २ जणांची ( एक महिला) ओळख पटलेली नाही. त्यामुळे एकूण ३ मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. उर्वरित ३ मृत व्यक्ती नायरमध्ये आहेत. हितेश मिस्त्री , मंजुबेन कंथोरिया व पुरुषोत्तम चोपदार अशी ३ मृत व्यक्तींची नावे आहेत.

आगीच्या ठिकाणी महापौरांची धाव

या आगीची माहिती मिळताच मी तात्काळ घटनास्थळी सकाळी 7.10 वाजताच पोहोचली. इमारतीमधील एका घरात जेव्हा आग लागली त्यावेळी इमारतीबाहेरून जाणाऱ्या स्थानिकांनी व शिवसैनिकांनी तात्काळ इमारतीमध्ये धाव घेऊन इमारतीमधील लिफ्ट बंद करून रहिवाशांना बाहेर काढले. काही लोकांना इमारतीच्या जिन्यावरून खाली आणले तर काही ज्येष्ठ नागरिकांना पाठीवर घेऊन बाहेर काढण्यात आले, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यावेळी, त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अरुण दुधवडकर हे उपस्थित होते.

तसेच, या आगीतील घटनेत जखमींना नायर, कस्तुरबा, भाटिया या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आपण त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे, जखमी नागरिकांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सदर इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा होती मात्र ती वेळीच कार्यान्वित झाली नसल्याचे समजते. मात्र सदर अग्निप्रतिबंधक यंत्रणा कशी कार्यान्वित करावी, वापरावी आणि आगीवर नियंत्रण कसे मिळवावे, याबाबतचे प्रशिक्षण नागरिकांना, इमारतीमधील रहिवाशी, सुरक्षारक्षक आदींना देणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.