Mumbai Fire : मुंबईतील विलेपार्ले परिसरातील LIC ऑफिसला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

mumbai fire breaks out in lic office in vile parle
मुंबईतील विलेपार्ले परिसरातील LIC ऑफिसला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातील आगीची घटना ताजी असताना आता मुंबईत पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेकडील लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (LIC) इमारतीमध्ये आग लागली आहे.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आज सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने ज्या वेळी आग लागली त्यावेळी सदर कार्यालय बंद स्थितीत होते. त्यामुळे या आगीच्या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अन्यथा अनर्थ ओढवला असता. मात्र आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर आगीवर सहा तासांच्या अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवले.
दरम्यान, एलआयसी ऑफीसमधील आगीची चौकशी करण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, विलेपार्ले (पश्चिम), एस. व्ही. रोड, नानावटी रूग्णालय नजीक असलेल्या तळमजला अधिक दोन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एलआयसीच्या ऑफिसमध्ये शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीची वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. ज्या वेळी आग लागली त्यावेळी सदर कार्यलय बंद होते. या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र एलआयसी या ऑफिसमध्ये एका तासातच आग भडकल्याने सकाळी ७.५४ वाजता अग्निशमन दलाने सदर आग स्तर -२ ची असल्याचे जाहीर केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन व ६ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर सहा तासांनी नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र एलआयसी ऑफिसमधील फर्निचर, सामान, ऑफिस रेकॉर्ड व ऑफिस जळाल्याने मोठे वित्तीय नुकसान झाले.

दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान पोलीस आणि अग्निशमन दलाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

आगीची चौकशी होणार

एलआयसी ऑफिसमध्ये लागलेल्या आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नाही मात्र आगीमुळे वित्तीय नुकसान झाले आहे. ही आग का व कशी लागली याबाबत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

दरम्यान कालचं नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. दरम्यान दुपारी लागलेली ही आग आठ तासानंतर आटोक्यात आली. ही आग आठ कंपन्यांमध्ये वेगाने पसरली होती. कंपन्यांकडे केमिकलचे ड्रम असल्याने हे ड्रम फुटले आणि भीषण आगीचा भडका उडाला. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान आपली सर्व यंत्रणा वापरून बाहेरून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत दोन कामगार बेपत्ता आहे, तर तीन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान आगीत अडकलेल्या चार जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. आणखी मजूर अडकले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. कंपन्यांमध्ये ठेवलेल्या केमिकलने भरलेल्या ड्रमच्या स्फोटामुळे पुन्हा पुन्हा भयानक स्फोट होत आहेत. विशेष म्हणजे जवळपास सर्वच कंपन्या खूप जवळ आहेत आणि त्यांच्यामधील अंतर एक ते दीड फूटही नाही. त्यामुळे आग मोठ्याप्रमाणात पसरली.