घरमुंबईजखमींवर उपचारांसाठी नकार देणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा; फडणवीसांची मागणी

जखमींवर उपचारांसाठी नकार देणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा; फडणवीसांची मागणी

Subscribe

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडूनही कारवाईचे आदेश

मुंबईच्या ताडदेव परिसरातील कमला इमारतीत आज भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर सकाळी साडे सातच्या सुमारास ही आग लागली आहे. मात्र या घटनेतील जखमींना काही रुग्णालयांनी उपचारांसाठी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. कोरोना चाचणी आणि पैशांअभावी या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यास नकार दिल्याचे म्हटले जातेय. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट, रिलायन्स आणि भायखळा येथील मसिना रुग्णालयाने या रुग्णांना उपचारांसाठी नकार दिल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. त्यामुळे जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेळीच या लोकांना उपचार मिळाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते. असंही या स्थानिकांनी सांगितले आहे. या घटनेवरून आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबईतील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांबद्दल मी सहानुभुती व्यक्त करतो. मात्र दुर्घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढल्याची माहिती आहे. ही गोष्ट खरी असेल तर मुंबई महापालिका आणि राज्य प्रशासनाने याची दख घेत तात्काळ कारवाई करावी. तसेच संबंधित जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडूनही कारवाईचे आदेश

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या घटनेसंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. महापौर म्हणाल्या की, जखमींना उपचारासाठी नकार देणाऱ्या रिलायन्स ,मसीना ,वोक्हार्ट रुग्णालयांना जाब विचारणार आहोत. तसेच नकार देणाऱ्या या रुग्णालयांवर कारवाई करण्यास आयुक्तांना सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘कमला’ इमारत आग दुर्घटना : पंतप्रधान मोदींकडून PMNRF मधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -