घरताज्या घडामोडीगणेशोत्सवादरम्यान कोविड प्रोटोकॉल अंमलबजावणीचे आवाहन

गणेशोत्सवादरम्यान कोविड प्रोटोकॉल अंमलबजावणीचे आवाहन

Subscribe

पुढील महिन्यात अर्थात सप्टेंबर २०२१ मध्ये साजरा होणारा श्री गणेशोत्सव हा गेल्यावर्षी प्रमाणेच ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणार आहे. ही बाब लक्षात घेता, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार आज एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयात परिमंडळ – २ चे उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना काळे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, रोजच्या दैनंदिन जीवनात आपण ज्याप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक बाबींची काळजी घेत आहोत, त्याचप्रमाणे गणेशोत्सवादरम्यान देखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील त्यांच्या स्तरावर याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आज आयोजित समन्वयात्मक बैठकीला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तीकार संघ इत्यादी संस्था – संघटनाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग, लेखा विभाग आणि इतर संबंधीत विभागांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मंडप उभारणी इत्यादी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

- Advertisement -

या बैठकीदरम्यान उपस्थित झालेल्या विविध मुद्यांबाबत मार्गदर्शन करताना उप आयुक्त श्री. काळे यांनी सांगितले की, यंदाचा गणेशोत्सव हा गेल्यावर्षी प्रमाणेच कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी ज्या गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आल्या होत्या, त्या गणेश मंडळांना यावर्षी देखील गेल्यावर्षीच्या धर्तीवर परवानग्या देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली आहे. तसेच कृत्रिम तलाव, श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रे इत्यादींची कार्यवाही व संख्या ही गेल्यावर्षी प्रमाणेच असणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे परिपूर्ण पालन करण्याचे आवाहन देखील श्री. काळे यांनी आजच्या बैठकीदरम्यान केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यथोचित सहकार्य वेळोवेळी करावे, असे निर्देश उप आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. तर ऑनलाईन परवाग्यांबाबत सुरुवातीला उद्भवलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे करण्यात आले असल्याची माहितीही या बैठकीदरम्यान देण्यात आली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -