CoronaVirus: मुंबईकरांची वाट यंदाही खड्डयांमुळे होणार बिकट

बहुतांशी कंत्राटदारांचे कामगार, मजूर गावाला निघून गेले तर काही गावाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या खराब रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याची शक्यता असून कामगारांअभावी कंत्राटदार हतबल ठरणार आहेत.

मुंबईतील रस्ते विकासाच्या कामांना मंजुरी दिल्यानंतरही कोरोनामुळे प्रत्यक्षात या कामांना सुरुवात झालेली नाही. या उलट प्रशासनाने नवीन कामे हाती घेण्याऐवजी सुरु असलेली कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. परंतु ज्या खराब रस्त्यांची कामे हाती घेण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे, त्यातील बहुतांशी कंत्राटदारांचे कामगार, मजूर गावाला निघून गेले तर काही गावाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या खराब रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याची शक्यता असून कामगारांअभावी कंत्राटदार हतबल ठरणार आहेत. त्याच पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्यासाठी नियुक्त केलेल्या परिमंडळ निहाय कंत्राटदारांनी मंजूर केलेला निधी संपल्यामुळे या कामाला हात लावलेला नाही. त्यामुळे हा पैसा मंजूर करण्यास विलंब होत असताना कंत्राटदारांनी थोपवून ठेवलेले कामगारही गावाला पळत असल्याने यंदा मुंबईकरांची वाट रस्त्यांवरील खड्डयांअभावी बिकट होण्याची दाट शक्यता आहे.

तत्कालिन महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी कोरोनाच्या काळात रस्ते मोकळे असल्याने कामे जलदगतीने करता येतील म्हणून सुमारे २०० रस्त्यांच्या कामांना मंजुरी विशेष सभा लावून घेतली. परंतु कोरोनामुळे रस्त्यांच्या एकाही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे जी कामे सुरु आहेत, तीच पूर्ण करण्यावर भर दिला आहे. यामध्ये यांत्रिक पध्दतीने केल्या जाणाऱ्या सिमेंट काँक्रीटची अर्धवट कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कंत्राटदारांकडून होत आहे. परंतु डांबरी रस्त्यांची कामे मात्र पूर्णपणे बंद आहेत.

महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राटदारांना कार्यादेश दिलेले आहेत. परंतु बऱ्याच कंत्राटदारांचे कामगार कामाला येत नाहीत. तसेच अनेक कामगार, मजूर हे गावी जाण्याच्या तयारीला लागले आहे. सगळे सध्या गावी जाण्यासाठी अर्ज भरण्याच्या रांगेत उभे आहेत आणि हे सर्व कामगार गावी जात आहे. त्याचा परिणाम निश्चितच मुंबईतील रस्ते विकासकामांवर पडलेला दिसेल. मात्र, जी कामे आम्ही मंजूर करून दिली आहेत आणि त्याचे कार्यादेश दिले आहेत, त्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराचीच असेल. पण आज जो कंत्राटदार केवळ कामगार आणि मजुरांअभावी कामे सुरु करत नाही, तो पावसाळ्यात खड्डे बुजवायला कुठून मजूर तयार करणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात आपण परिमंडळ निहाय खराब रस्त्यांची डागडुजी व खड्डे बुजवण्याच्या कामांसाठी कंत्राटदारांची निवड करून ठेवले आहे. त्यातील काही कंत्राटदारांना मंजूर झालेला निधी संपला आहे, तर काहींचा आहे. परंतु आज अशी परिस्थिती आहे की, ज्यांच्याकडे निधी नाही, त्यांच्याकडे अजुनही कामगार आहेत. तर ज्यांच्याकडे निधी आहे,त्यांच्याकडे कामगार नाही. त्यामुळे पावसाळ्यात या कंत्राटदारांकडूनही कसे खड्डे बुजवून घ्यायचे हीसुध्दा मोठी समस्या असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

यासंदर्भात महापालिकेच्या रस्ते विभागाच्या एका कंत्राटदाराशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, सध्या कामगार कोरोनामुळे गावी जायला निघालाय. तो कुठल्याही परिस्थितीत इथे राहायला तयार नाही, असे म्हणाले. आतापर्यंत आम्ही त्यांना थोपवून धरले आहे. त्यांना दुप्पट पगार देण्याचेही कबूल केले. परंतु ते कोणीही ऐकायला तयार नाही. आज सर्व कामगार गावी जाण्यासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे हे सर्व कामगार गावी जाणारच असल्याने केवळ रस्त्यांची आणि पर्यायाने खड्डयांची कामे रखडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.