‘मरे’च्या दादर रेल्वे स्थानकातील गर्दीचे होणार विभाजन; प्रवाशांना मोठा दिलासा

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दादर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकातून अनेक गाड्या सुटत असतात. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते.

dadar railway station

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दादर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकातून अनेक गाड्या सुटत असतात. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. परिणामी प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळे आता मध्य रेल्वेने दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ यांच्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. (Mumbai Local Central Railway Has Started Efforts To Decongest Dadar Railway Station)

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात विशेषत: प्लॅटफॉर्म क्रमांक-४वरील गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) उपनगरात धावणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला दुहेरी जोडणी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक-३वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल थांबतात. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ यांच्यामध्ये लोखंडी जाळीचे कुंपण आहे. ते हटवून लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म ५चा देखील पर्याय खुला करून देण्याचे काम सुरू आहे. सर्व तपासणीअंती आणि रेल्वेगाड्यांची वाहतूक अबाधित ठेवून हे शक्य झाल्यास प्लॅटफॉर्म क्रमांक ‘४ ए’ या नव्या प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना लोकल पकडणे शक्य होणार आहे.

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातून दरदिवसाला २ लाख २७ हजार ३७५ सरासरी प्रवासी प्रवास करतात. दरम्यान, या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५वरून अगदी मोजक्याच मेल-एक्स्प्रेस धावतात. या गाड्यांच्या वेळा वगळता अन्य वेळेत या प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट असतो. आपत्कालीन स्थितीत या प्लॅटफॉर्मवर लोकल वाहतूक होते. प्लॅटफॉर्म-४वर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते.

मुख्य पुलाच्या आणि स्वामी नारायण मंदिरदिशेकडे उतरणाऱ्या पुलांच्या पायऱ्यांची जोडणी प्लॅटफॉर्म ५वर आहे. प्लॅटफॉर्मवर ठाण्याच्या दिशेला लिफ्ट आणि बंद अवस्थेत रेल्वे कार्यालय आहे. कार्यालय आणि लिफ्टची नव्या ठिकाणी उभारणी आणि पुलांच्या पायऱ्या ही प्रमुख आव्हाने रेल्वे प्रशासनासमोर आहेत. संबंधित तज्ज्ञ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं; कॉंग्रेसचा राज ठाकरेंवर हल्लाबोल