घरताज्या घडामोडीमुंबईकरांची होतेय 'लोकल' भूल

मुंबईकरांची होतेय ‘लोकल’ भूल

Subscribe

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी ठरावीक वेळेत सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दररोज 50 ते 100 इतक्याच नव्या रुग्णांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई लोकल सुरू झाल्याने मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत असल्याचे सांगत राज्य सरकारकडूनच नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दहावी-बारावीच्या परिक्षा तोंडावर असताना मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली जाईल का यावरून विद्यार्थी आणि पालकवर्गात संभ्रम, गोंधळाचे वातावरण आहे. महिनाभरात देशभरात केवळ एक टक्का नागरिकांनीच कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारची उपलब्ध आकडेवारी बरीच बोलकी असल्याची दिसते.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्याने लॉकडाऊन उठवण्यात येत आहे. मात्र, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन ही सर्वसमान्यांसाठी बंद असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत होते. लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या नोकर्‍या जाऊन त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळत असल्याने सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी ठरावीक वेळेत रेल्वेसेवा सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढण्यास सुरुवात झाल्याची आवई पालिकेकडून उठवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंतची रुग्णसंख्या पाहता मुंबईमध्ये दररोज 400 ते 500 दरम्यान रुग्ण आढळत होते. रेल्वे सुरू झाल्यानंतर 9 फेब्रुवारीपर्यंत हा आकडा कायम राहिलेला आहे. त्यानंतर 10 ते 17 फेब्रुवारीदरम्यान या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ झाली. मात्र, ही रुग्णसंख्या सुद्धा दैनंदिनी 500 ते 600 दरम्यान आहे. त्यामुळे रेल्वे सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्येत दैनंदिन किमान 50 ते 100 इतक्याच नव्या रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास रेल्वे सेवा जबाबदार असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, दुसरीकडे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांकडून कोरोना रुग्ण वाढीसाठी रेल्वे हे एकमेव कारण नसून, शहरातील वाढती गर्दी, लग्न समारंभ, सोशल गॅदरिंग, मास्क न लावता फिरणार्‍यांची वाढती संख्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे मुंबईमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाल्याचे चित्र उभे करून नागरिकांमध्ये भीती पसरवत असल्याचे दिसून येते. ही भीती पसरवण्यामागे अधिकारी, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचा नेमका कोणता हेतू आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

एकटी लोकलच जबाबदारी नाही

लोकल सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात फारशी वाढ झालेली नाही. मात्र, दुसर्‍या आठवड्यात रुग्णसंख्येमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. या रुग्णसंख्या वाढीसाठी रेल्वेसेवा हे एकमेव कारण नसून, सध्या मुंबईबाहेरून येणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तसेच लग्न समारंभ आणि सोशल गॅदरिंगही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
– मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

गाफील राहू नका

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ होण्यामागे विविध कारणे असली तरी नागरिकांनी गाफील राहता कामा नये. नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत, घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करावे. लग्न समारंभ, विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.

- Advertisement -

कशी आहे रूग्णांची आकडेवारी 

16 ते 31 जानेवारी 2021

तारीख          कोरोना रुग्ण
16 जानेवारी – 571
17 जानेवारी – 531
18 जानेवारी – 395
19 जानेवारी – 473
20 जानेवारी – 501
21 जानेवारी – 527
22 जानेवारी – 483
23 जानेवारी – 435
24 जानेवारी – 479
25 जानेवारी – 348
26 जानेवारी – 342
27 जानेवारी – 435
28 जानेवारी – 394
29 जानेवारी – 494
30 जानेवारी – 429
31 जानेवारी – 483

फेब्रुवारी 

1 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी
तारीख रुग्ण
1 फेब्रुवारी – 328
2 फेब्रुवारी – 334
3 फेब्रुवारी – 504
4 फेब्रुवारी – 463
5 फेब्रुवारी – 415
6 फेब्रुवारी – 414
7 फेब्रुवारी – 448
8 फेब्रुवारी – 399
9 फेब्रुवारी – 375
10 फेब्रुवारी – 558
11 फेब्रुवारी – 510
12 फेब्रुवारी – 599
13 फेब्रुवारी – 529
14 फेब्रुवारी – 645
15 फेब्रुवारी – 493
16 फेब्रुवारी – 461
17 फेब्रुवारी – 721

‘आपल महानगर’ची भूमिका 

बाहेर मास्क लावा, सॅनेटायझर वापरा, बेफीकीरपणा नको

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राज्य सरकारच्या उपलब्ध आकडेवारीवरून ही वाढ फार मोठी नसल्याचे दिसून येत आहे. लोकल सुरू झाल्यानंतर रूग्ण वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी कोरोना अद्याप पूर्णत: नष्ट झालेला नाही, हे सत्य आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकिरीने वागू नये. घराबाहेर पडताना मास्क लावणे, वारंवार हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, ज्यांना शक्य असेल त्यांनी लस घेणे आदी उपाय करणे आवश्यक आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -