मुंबई : रविवारी, 12 जानेवारीला सुटीच्या दिवशी रेल्वे प्रशासनाने लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुटीचा दिवस आहे, म्हणून जर का मुंबईकर बाहेर फिरण्याचा कोणता विचार करत असतील तर त्यांनी लोकलचे वेळापत्रक नक्की पाहावे. रेल्वे प्रशासनाने रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांची पाहणी आणि त्याची दुरुस्ती याकरिता तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर, मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकवर, तर ट्रान्स हार्बरवर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai Local Megablock Mumbaikars must check the train schedule before leaving home on Sunday, 12 th January)
पश्चिम रेल्वे…
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी, 12 जानेवारी 2025 रोजी सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. तर या दरम्यान काही उपनगरी गाड्या रद्द राहणार आहेत. तसेच काही अंधेरी आणि बोरिवली लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत चालवल्या जातील.
मध्य रेल्वे…
रविवारी, 12 जानेवारीला मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे, अशा पाचव्या- सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 08 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या वेळेमध्ये ठाणे येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर एलटीटीकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. डाऊन मार्गाने जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर धावतील आणि पाचव्या मार्गावर वळवली आहेत. पटना-एलटीटी, काकीनाडा-एलटीटी, एलटीटी- गोरखपूर, एलटीटी-जयनगर पवन आणि एलटीटी-तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस विलंबाने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ट्रान्स हार्बर…
ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी / नेरूळ अप, डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल/वाशी/नेरूळ येथून ठाणेकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणेहून वाशी/नेरूळ/ पनवेलसाठी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा या काळात बंद राहतील.
हेही वाचा… Maharashtra Weather : तापमानाच्या पाऱ्यात होतेय वाढ, हवामान विभागाकडून अवकाळीचा इशारा