घरमुंबईमुंबईत उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार; सामान्यांचा ट्रेन प्रवास बंद होण्याची शक्यता...

मुंबईत उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार; सामान्यांचा ट्रेन प्रवास बंद होण्याची शक्यता – महापौर 

Subscribe

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबई डेंजर झोनमध्ये आली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उद्यापासूनच कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसेच, सामान्य प्रवाशांना ट्रेन प्रवास करणे बंद केले जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसाला कोरोनाचे ५ ते ६ हजार रुग्ण आढळून येत असून ही संख्या १० ते २० हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत गेल्या रविवारपासून रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता रात्री ८ नंतर मुंबईत हॉटेल्स, दुकाने, फेरीवाला व्यवसाय आदी बंद करण्यात येत आहेत. मात्र रात्री ते सकाळपर्यंत जरी कोरोना वाढू नये म्हणून काळजी घेतली जात असली तरी दिवसभरात ट्रेन, बस, मार्केट आदी ठिकाणी गर्दी होत असते. त्यामुळे लोकांची बेफिकिरी वाढत जाऊन गर्दी आणखीन वाढते आहे. परिणामी कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरीलप्रमाणे शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता

वाढत्या गर्दीला आणि कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच, वयोवृद्ध आणि लहान मुले यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी धार्मिक स्थळे बंद केली जातील. त्याचप्रमाणे गर्दीची ठिकाणे असलेले थिएटर, मॉल हेसुद्धा बंद केले जातील. ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास बंदी करण्यात येईल. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्यास परवानगी असेल. खासगी कार्यालयात दोन शिफ्टमध्ये आणि ५० टक्के उपस्थितीत काम करणे बंधनकारक केले जाऊ शकते. दुकानात होणारी गर्दी रोखण्यासाठी दुकाने एक दिवस आड उघडण्यात येतील, असे महापौरांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -