मुंबईत लव्ह जिहाद? भांडुपची अल्पवयीन मुलगी थेट आजमगढला, सोमय्यांचा आरोप

 

मुंबईः भांडुप येथील १३ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १९ वर्षीय मुस्लीम मुलाने थेट आझमगढला नेले. तेथून तिची सुटका करण्यात आली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुलीच्या सुटकेचा थरार धक्कादायक आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पत्रकार परिषदेत पीडित मुलीच्या वडिलांनी सर्व हकीकत सांगितली. ही घटना भांडूप येथे घडली. पीडित मुलीच्या घराजवळ सैफ खान हा तरुण सलोनमध्ये काम करत होता. त्याने पीडित मुलीला प्रेमाची भुरळ घातली. तिचा फसवून जबरदस्तीने आझमगढला नेलं. तेथे तिला एका गावात कोंडून ठेवण्यात आलं. तिचा मोबाईलही काढून घेण्यात आला. हे काम तो मुलगा एकटा करु शकत नाही. त्याच्या कुटुंबीयांना सर्व प्रकार माहीत होता. हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पीडित मुलीचे वडिल म्हणाले, ८ मे रोजी ही घटना घडली. माझी मुलगी घरात नव्हती. पावणे अकराच्या सुमारास मला सासूचा फोन आला की मुलगी घरात नाही. मुलगी हरवल्याची तक्रार मी भांडुप पोलीस ठाण्यात दिली. मुलीचा शोध सुरु झाला. मुलगी साडपली नाही. त्यानंतर मुलीचा मला फोन आला. बाबा, मी एका घरात आहे. मी विचारलं तुझ्या आजूबाजूला कुणी काका, काकू किंवा मोठं माणूस आहे का? त्यांना फोन दे आम्ही येतो तिकडे. त्यानंतर मुलगी मला म्हणाली, मी कुठे आहे मला काहीच सांगता येत नाहीये. नंतर मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही जी पोलीस तक्रार दिली आहे ती रद्द करा. त्यानंतर थोड्यावेळाने फोन आला की, बाबा माझं लग्न झालंय, मला विसरुन जा, घ्यायला येऊ नका. तिने केलेल्या फोनमुळे पोलिसांनी लोकेशन ट्रॅक केलं. त्यामुळेच मुलीचा शोध लागला.

मुलगी सापडल्यानंतर मी तिला विचारलं तू असं का सांगितलंस की तुझं लग्न झालंय. मला त्या घरातल्यांनी सांगितलं की तु तुझ्या वडिलांना सांग की तुझं लग्न झालं आहे. मला न्यायला येऊ नका. पोलीस तक्रार मागे घ्या, हे सर्व त्यांनीच मला सांगितलं होतं. म्हणून मी तुम्हाला फोन करुन तसं सांगितलं, असं मुलीने मला सांगतिल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं.